तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांची माहिती...
मालवण (प्रतिनिधी) शिवसेनेचे सचिव, खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त १५ मार्च रोजी मालवण तालुका शिवसेनेच्यावतीने मालवणात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, खास. राऊत यांच्या रूपाने जिल्ह्याला विकासपुरुष लाभला आहे. पायाला भिंगरी लावून खास. राऊत काम करत असून प्रत्येक गावात पोहचले आहेत. गावागावातील समस्या जाणून घेत सोडविण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. सात वर्षे खासदार म्हणून काम करताना जिल्ह्यातील प्रश्न संसदेत मांडले तसेच पहिल्या खासदारांमध्ये येण्याचा मान मिळवला आहे, त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते असल्याचा आम्हाला गर्व आहे, असेही हरी खोबरेकर म्हणाले. जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होण्यात अडचणी आल्या, मात्र त्या सोडवून खास. राऊत यांनी महाविद्यालय सुरू केले. या महाविद्यालयामुळे भविष्यात जिल्ह्यात डॉक्टरांची कमतरता भासणार नाही, इतर ठिकाणचे लोक उपचारसाठी जिल्ह्यात येतील, जिल्ह्यातील जनतेची वणवण देखील कमी होईल, महाविद्यालयामुळे सुगीचे दिवस जिल्हा वासीयांना लाभणार आहेत, असेही हरी खोबरेकर म्हणाले. खास. विनायक राऊत यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी कांदळगाव येथे श्री देव रामेश्वर मंदिरात १५ रोजी सकाळी लघुरुद्र व आरती करण्यात येणार आहे, असे खोबरेकर यांनी सांगितले. यावेळी बबन शिंदे यांनी खासदार राऊत यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा होणार असल्याचे सांगत महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा आयोजित केली असून यासाठी होम मिनिस्टर फेम व शिवसेनेचे उपनेते आदेश बांदेकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे, असे सांगितले.
तर बाबी जोगी यांनी खास. राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेकडून ग्रामीण रुग्णालयास आवश्यक व उपयोगी साहित्य देणार येणार आहे असे सांगितले. तर खासदार राऊत यांनी जिल्हा नियोजनच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतून मालवणसाठी मंजूर केलेल्या स्ट्रीट लाईट व हायमास्ट टॉवरच्या कामांची भूमिपूजने करण्यात येणार आहेत, असे सांगितले. शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर यांनी नाराजीने राजीनामा दिल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना हरी खोबरेकर म्हणाले, जिथे अन्याय होईल तेथे वाचा फोडली पाहिजे, अशी शिकवण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे.
त्यानुसार नगरपालिकेत भ्रष्टाचार झाला असे गणेश कुडाळकर यांना वाटत असल्याने त्यांनी यावर वाचा फोडली असेल. भ्रष्टाचारात कोणतेही नगरसेवक असोत, इतर असतील किंवा शिवसेनेचे असतील, भ्रष्टाचार झाला असेल तर तो कुडाळकर यांनी समोर आणला पाहिजे. एक शिवसैनिक म्हणून आम्ही कुडाळकर यांच्या सोबत आहोत. कुडाळकर यांचा राजीनामा आपल्याकडे आलेला नाही, आम्ही निष्ठावंत शिवसैनिकांचे महत्व कधीही कमी करत नाही. कोणाला डावलल्याचे आम्हाला जाणवले नाही, शिवसेना वाढीचे काम आम्ही सुरू ठेवणार आहोत, असेही हरी खोबरेकर म्हणाले.
