मालवण (प्रतिनिधी) आज तारकर्ली गावचे नाव जागतिक पर्यटन नकाशावर झळकत आहे. एक उत्तम दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून तारकर्ली गावच्या ग्रामपंचायतीची जबाबदारी देखील मोठी असून गाव विकासाची ही घोडदौड कायम ठेवली पाहिजे. ग्रामपंचायतीची इमारत अतिशय उत्तमप्रकारे नूतनीकरण करण्यात आले असून तारकर्ली ग्रामपंचायतीने तारकर्लीच्या नावलौकीकाला साजेसे काम करावे, गावच्या विकासकामात सहकार्य करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनी येथे बोलताना केले. तारकर्ली काळेथर ग्रामपंचायत इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले असून त्याचा लोकार्पण सोहळा भाजपा प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणेंच्या हस्ते शनिवारी संपन्न झाला. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, सरपंच सौ. स्नेहा केरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाजपा तालुकाध्यक्ष तथा माजी सभापती धोंडी चिंदरकर, हडी सरपंच महेश मांजरेकर, आनंद शिरवलकर, डॉ. जितेंद्र केरकर यासह सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना निलेश राणे यांनी तारकर्ली ग्रामपंचायतीच्या कार्याचे कौतुक केले. तसेच विकासकामांसाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी नेहमीच आग्रही भूमिका ठेवत प्रसंगी आंदोलन छेडणारे डॉ. केरकर व स्नेहा केरकर यांच्या कामाचेही राणे यांनी कौतुक केले. पर्यटनामुळे तारकर्ली ही मालवण तालुक्यातील एक महत्वाची ग्रामपंचायत असून सरपंच सौ. केरकर व त्यांचे सहकारी या ग्रामपंचायतीस १०० टक्के न्याय देतील अशी आपणास आशा आहे, गावच्या विकास कामासाठी निधी मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असेही यावेळी निलेश राणे म्हणाले. सीआरझेड कायद्यामुळे ग्रामपंचायत इमारतीच्या बांधकामास अनेक अडचणी निर्माण होत होत्या. मात्र, याबाबत केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे लक्ष वेधल्यावर त्यांच्या माध्यमातून प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करून जुन्या इमारतीस मंजुरी मिळाली व इमारतीचे काम पूर्ण झाले असल्याचे सरपंच केरकर यांनी सांगत ना. राणे यांचे आभार मानले. यावेळी सभापती अजिंक्य पाताडे, हडी सरपंच महेश मांजरेकर यांनीही विचार मांडताना ग्रामपंचायत व सरपंच यांच्या कामकाजाचे कौतुक केले. यावेळी ग्रा.प. सदस्य, कर्मचारी, व ग्रामस्थ उपस्थित होते.
