आंगणेवाडी यात्रा उत्साहात सुरू

भाविकांची श्री देवी चरणी मोठ्या संख्येने धाव;पहाटे सुरू झाले दर्शन

मालवण ता.२४-:* कोकणात म्हणा किंवा मालवणी मुलखात म्हणा जत्रांची काही कमी नाही आणि जत्रा असल्या म्हणजे आनंदाला तोटा नाही. मात्र गेली दीड दोन वर्ष मालवणी मूलखातच नव्हे महाराष्ट्रात नव्हे तर देश – जगभरात कोरोनाने सगळाच आनंद हिरावून घेतला.त्यातलाच एक जत्रेत फिरण्याचा जो आनंद असतो ना तो आनंदच कोरोनाने हिरावून घेतला. गावोगावच्या जत्रा असुदेत कनेक्टिव्हिटीचा महा इव्हेंट म्हणून ओळखला जाणारा आंगणेवाडची भराडी देवीची यात्रा असुदेत यात्रेची मजा काही औरच आहे. आता कोरोनाचे संकट काहीसे दूर झाले आहे अशावेळी कोरोनाचे नियम पाळून का होईना मर्यादित स्वरूपात का असेना आणि मुख्य म्हणजे जत्रोत्सवाच्या निमित्ताने आंगणेवाडीत गावोगावच्या भराडीच्या भक्तांना घेऊन जाणाऱ्या लाल परीच्या कर्मचाऱ्यांचा संप असला तरी आंगणेवाडीच्या यात्रेचा आनंद हा नक्कीच लुटला जाईल यात तिळमात्र शंका नाही.

कोकण हा धार्मिक रूढी परंपरा जपणारा प्रदेश म्हणून ओळखला जातो. कोकण प्रांतात गावोगावी ज्या काही ग्रामदेवता आहेत त्यांच्या वार्षिक जत्रा या भरत असतात. तिथीनुसार होणाऱ्या या जत्रांना भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा त्यातीलच एक यात्रा होय. फरक एवढाच या हि यात्रा तिथीनुसार ठरत नाही. तर आंगणे कुटुंबीय मंदिराच्या सभागृहात डाळीवर बसून जत्रेची तारीख ठरवतात. आंगणे कुटुंबीयांनी यात्रेची तारीख ठरविल्यानंतर तारखेत कोणताही बदल होत नाही. साधारणपणे देवदिवाळी नंतर म्हणजेच डिसेंबर महिन्यात आंगणेवाडीची यात्रा ठरते.

फेब्रुवारी अथवा मार्च महिन्यात आंगणे कुटुंबीय सर्व गोष्टींचा सारासार विचार करीत हि तारीख ठरवितात. ४०-४५ वर्षांपूर्वी या यात्रेचे स्वरूप हे मर्यादित स्वरूपाचे होते. मात्र श्री भराडी देवीच्या जागृततेमुळे या यात्रेचे स्वरूप आता बदलले आहे. अलीकडच्या काळात यात्रेला उपस्थित राहणाऱ्या भाविकांची संख्या हि १४ ते १५ लाखाच्या घरात पोहचली आहे.यावर्षी कोरोनाच्या सावटाखाली ही जत्रा होत असल्याने तिचे स्वरूप मर्यादित आहे कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून हा यात्रोत्सव होतोय खरं तर पूर्वी यात्रेची तारीख ठरल्यानंतर एसटी बसवर, रिक्षांवर, गावात असणाऱ्या वार्ता फलकाच्या फळकुटावर यात्रेच्या तारखेची जणू ब्रेकिंग न्यूज दिली जायची. आंगणेवाडीत मंदिराच्या सभामंडपात यात्रेविषयी ग्रामस्थांनी घेतलेला निर्णय कर्णोपकर्णी कळायचं आणि वातावरणात एक वेगळा उत्साह संचारायचा. त्याकाळी फेसबुक, व्हॉट्सअप यासारखी सोशल मीडियाची वेगवान प्रसारमाध्यमे नव्हती. मात्र एसटी, रिक्षा, आंतरदेशीय पत्र, पोस्टकार्ड, गावचे फलक, जत्रेचा तोंडी धाडलेला सांगावा हिच त्याकाळची प्रसारमाध्यमे होती. आज सोशल मीडिया वरील प्रसामाध्यमे जलद गतिने एखादी माहिती लोकांपर्यंत पोहचवत आहेत. मात्र त्यात सत्यासत्यता किती याविषयी शंकाही घेतली जाते. अलीकडच्या काळात तर सोशल मीडियावर यात्रेच्या तारखेचे अफवांचे पेव फुटते. मात्र जग जरी बोटाच्या एका क्लिकवर आले असले तरी प्रिंट मीडिया आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे पारंपरिक प्रसारमाध्यमे यावर जोपर्यंत यात्रेची तारीख प्रसारित होत नाही तोपर्यंत भाविक त्यावर विश्वास ठेवत नाही.

एवढा विश्वास या पारंपरीक प्रसारमाध्यमांनी निर्माण केला आहे. जत्रेचा दिवस जसजसा जवळ येतो तसतसे वातावरण उल्हासित होते. जत्रेच्या दिवशी तर जत्रेला उपस्थित राहणाऱ्या भाविकांचा आनंद तर ओसंडून वाहत असतो. यात्रेदिवशी आंगणेवाडीत जो भक्तांचा महाकुंभमेळा भरतो, त्या मेळ्यात हौशा नवश्या गवश्यांची तऱ्हा निराळीच असते. यात्रेत लहानांपासून थोरा मोठ्यांपर्यंत हरवणाऱ्यांची संख्या हि फार मोठी असते. एखादा चिमुरडा जत्रेत ज्यावेळी हरवतो अथवा मित्रांमधील एखादा सवंगडी जत्रेत गुम होतो त्यावेळी त्या चिमुरड्याचे पालक अथवा त्याचे मित्र हे मंदिराच्या मागे असणाऱ्या जत्रेवर नियंत्रण ठेवणाऱ्या कक्षाकडे संपर्क साधतो आणि काही वेळापूरत्या निर्माण झालेल्या हरवले- गवसले च्या खेळास पूर्णविराम मिळतो.

जत्रेत सहभागी झालेली मंडळी हरवल्यास कुठे भेटायचे याचे अगोदरच नियोजन करून ठेवतात. आंगणेवाडी यात्रा हि इव्हेंट मॅनेजमेन्टचे शिक्षण आत्मसात केलेल्या युवक युवतीला एकवेळ यशस्वी करणे कठीणप्राय ठरेल. मात्र इव्हेंट मॅनेजमेन्ट मधील कोणतीही पदवी न घेता आंगणेवाडीवासीय केवळ कनेक्टिव्हिटीचा तंत्र शुद्ध वापर करीत यात्रोत्सवाचा महाइव्हेंट पार पाडतात त्यावेळी साऱ्यांनीच मति गुंग झाल्याशिवाय राहत नाही.

You cannot copy content of this page