कणकवली : कोरोनाचे संकट अद्याप टळले नसून नागरिकांनी नेहमी मास्क चा वापर करावा. सोशल डिस्टन्स राखत नियमित सॅनिटायजर ने हात स्वच्छ करावेत असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश भोसले यांनी केले. महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापनदिनानिमित्त पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने कणकवली एसटी बस स्थानकावर कोरोनासंदर्भात जनजागृती करतानाच मोफत मास्क चे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश भोसले यांनी कोरोनाबाबत घ्यावयाच्या दक्षतेबाबत उपस्थितांना माहिती दिली. कोरोनावर लस आली असली तरी अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही.स्टेन सारखा कोरोनाचा आणखी धोकादायक रोगही पसरू लागला आहे. त्यामुळे जनतेने कोरोनाचा धोका टळला आहे अशा भ्रमात राहू नये. नेहमी सॅनिटायजर चा वापर करून हात स्वच्छ ठेवावेत. सर्दी, ताप ,खोकला, डोकेदुखी ची लक्षणे असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेत वैद्यकीय उपचार करावेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी दो गज दुरी …मास्क है जरुरी हे न विसरता सोशल डिस्टन्स पाळावे आणि नियमित मास्क चा वापर करावा असे आवाहनही पोलीस निरीक्षक भोसले यांनी केले. यावेळी सिद्धेश सावंत यांच्या सौजन्याने पीआय भोसले यांच्या हस्ते उपस्थित नागरिकांना मोफत मास्कचे वाटप करण्यात आले. आभार वाहतूक पोलीस अंमलदार प्रकाश गवस यांनी मानले. वाहतुकीचे नियम पाळून सुरक्षित वाहन चालवा असे नेहमीच वाहतूक पोलीस सांगत असतात. मात्र त्याहीपलीकडे जात सामाजिक भान राखत जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी वाहतूक पोलीस अंमलदार प्रताप नाईक , पांडुरंग पांढरे, प्रकाश गवस, विष्णू सावळ, विठ्ठल पालकर, सुनील निकम, गणेश सकपाळ , सावकार वावरे, नितीन शेट्ये आदी उपस्थित होते.
कोरोनाचा धोका टळला नसल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगा – अविनाश भोसले
