मालवण (प्रतिनिधी) मालवण चव्हाटा आंबेरी ग्रामीण मार्ग ४०७ हा चौकेला जोडणारा रस्ता मंजूर होऊन २०१९ साली काम सुरू करण्यात आले. आंबेरी मुख्य रस्ता ते वाक १० ते १२ किमीपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
याप्रकरणी संबंधित ठेकेदार, कार्यालय यांनी दखल न घेतल्यास व येत्या आठ दिवसांत रस्त्याचे काम सुरुवात न केल्यास सर्व ग्रामस्थ, शाळकरी विद्यार्थी, महिला उपोषणाचा मार्ग अवलंबतील, असा इशारा किशोर वाक्कर व बाळा आजगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. सदर रस्ता २०१८-१९ मध्ये मंजूर असून काम पूर्ण करण्याचा कालावधी ६ मार्च २०२० होता. तरीही रस्त्याचे काम अद्याप पूर्ण करण्यात आलेले नाही. रस्त्यावर बऱ्याच मोठ्या प्रमाणात खड्डू पडले असून ग्रामस्थांना वाहन चालविणे कठीण झाले आहे. वाक ग्रामस्थांना हाच रस्ता सोयीस्कर ठरत असल्याने रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. याप्रकरणी संबंधित कंत्राटदार व कार्यालयाकडून दिरंगाई होत आहे.
