विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा
कणकवली 9 फेब्रुवारी (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध झाल्या आहेत.या शैक्षणिक सुविधांचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला पाहिजे.तुम्ही घेतलेल्या विद्येचा फायदा देशासाठी झाला पाहिजे कारण ज्या देशातील नागरिक सुशिक्षित असतात.तो देश विकसीत समजला जातो.आर्थिकदृष्ट्या जर एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षण घेता येत नसेल. तर त्याला मदतीचा हातभार लावणे. हे आपले सामाजिकदायित्व आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आनंद अंधारी यांनी व्यक्त केले. शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली संचलित विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवलीचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा प्रशालेच्या सभागृहात आयोजित केला होता.या प्रसंगी ते बोलत होते.यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन पी.डी. कामत, सचिव विजयकुमार वळंजू,ट्रस्टी डॉ.राजश्री साळुंखे,मुख्याध्यापक भारत सरवदे,पर्यवेक्षक पी.जी.कांबळे माजी पर्यवेक्षक जे.ए.खांबल,अच्युतराव वणवे आदी मान्यवर तसेच शिक्षक , शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी,पालक उपस्थित होते. अध्यक्ष पी.डी.कामत म्हणाले,
विद्यार्थ्यांनी यश मिळाले म्हणून हुरळून जायचे नसते अन् अपयश आले.म्हणून खचून नजाता नव्या आव्हानांशी सामना केला पाहिजे.तसेच यश मिळवणे सोपे असते पण त्यात सातत्य टिकवून ठेवणे अवघड असते.त्यामुळे मिळवलेले यश टिकवून ठेवत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या उन्नती व उत्कर्षासाठी नेहमीच पराकष्टा केली पाहिजे.यशवंत विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरुपात मिळालेली कौतुकाची थाप ही स्फूर्तीदायी असल्याचे त्यांनी सांगितले. विजकुमार वळंजू म्हणाले, कोणत्याही क्षेत्रात यशवंत होण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. शालांत परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना यश मिळते ते कायम टिकवणे महत्वाचे असते. विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांनी यापुढील शैक्षणिक प्रवासात उत्तुंग यश संपादन करून प्रशालेचे व आपल्या कुटुंबाचे नाव उज्वल करावे. डॉ.राजश्री साळुंखे म्हणाल्या, विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे आपल्या जीवनात अमुलाग्रह बदल झाले आहेत. आता विज्ञान आणि तंत्रज्ञान वापर विद्यार्थ्यांनी आपली ज्ञानकक्षा वाढविण्यासाठी केला पाहिजे . पुस्तकातून विद्यार्थ्यांना ज्ञान मिळते तर निसर्गातून आपल्याला खूप काही शिकता येते.शिक्षक हा ज्ञानाचा भांडार असून या भंडारातील ज्ञान विद्यार्थ्यांनी आत्मग्रहण करत या ज्ञानाचा वापर योग्यरीत्या केला पाहिजे.
शाळा हे विद्यार्थ्याच्या जडणघडणीचे केंद्र असून विद्यार्थ्यांनी मनी बाळगलेल्या ध्येयपूर्तीसाठी सातत्याने प्रयत्नशील रहावे. यावेळी जे.ए. खांबल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना यशस्वी होण्याचा कानमंत्र दिला.शिक्षण आणि अभ्यास किती महत्वाचा आहे याचे महत्व विशद केले.तसेच गणित विषयात सुयश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी बक्षीसाची घोषणा त्यांनी यावेळी केली. संपदा धुरी, सेजल परब , जिज्ञासा गावडे,ऋषिकेश मेस्त्री यांच्यासह,राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविलेल्या प्रशालेचा विद्यार्थी आर्यन पवार व शिष्यवृत्तीत यश संपादन केलेल्या राजवर्धन भानुसे, वेदा बंड यांच्यासह विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन जनार्दन शेळके यांनी केले. तर आभार अच्युतराव वणवे यांनी मानले .
