जिल्ह्याच्या व्यापार-उद्योगासाठी होणार महत्वपूर्ण घोषणा
देवगड ता.२९-: राज्यातील व्यापार-उद्योग व कृषि पुरक उद्योगांची शिखर संस्था महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर चे नवनिर्वाचित अध्यक्ष ललित गांधी सोमवार दि. 31 जानेवारी 2022 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत. 31 जानेवारी रोजी कणकवली येथे होणार्या व्यापारी मेळाव्याच्या उद्घाटन समारंभास ते उपस्थित राहणार असुन, दिवसभरात विविध व्यापारी व औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधिबरोबर वेगवेगळ्या बैठकीत सहभागी होणार आहेत.
शतकमहोत्सवाकडे वाटचाल करणार्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स च्या 40 व्या अध्यक्षपदी नुकतीच ललित गांधी यांची निवड झाली असुन अध्यक्षझाल्यानंतरच्या त्यांच्या या पहिल्या दौर्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या व्यापार-उद्योगांसाठी काही विशेष महत्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या या दौर्याकडे जिल्ह्याच्या व्यापार-उद्योग क्षेत्राचे लक्ष आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे राज्यभरात महिला क्लस्टर्स, कृषि प्रक्रिया क्लस्टर्स व उत्पादकता क्लस्टर्स संपुर्ण राज्यभरात उभारण्याची योजना आखली जात असुन या योजनेत कोकण च्या वाट्याला काही येणार का याबाबतही मोठी उत्सुकता असुन, व्यापारी उद्योगांसमोर करोना कालखंडात झालेले नुकसान, महापुरात झालेले नुकसान याबाबत काही उपाययोजना व्हाव्यात अशीही व्यापारी वर्गातुन अपेक्षा व्यक्त होत आहे.
