गुन्हे दाखल झाल्याचे दुःख नाही;मंगेश तळवणेकर यांचे स्पष्टीकरण
*⚡सावंतवाडी ता.१३-: एसटी सेवा सुरु झाल्याने प्रवासी, ग्रामस्थ, विद्यार्थी आणि भाजीपाला विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसत आहे, त्यातच आमचे समाधान आहे. सावंतवाडी येथे काढलेल्या जनमोर्चाचे हे फलित असून गुन्हे दाखल झाल्याचे कोणतेही दुःख नाही, असे विठ्ठल-रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
विठ्ठल-रखुमाई शेतकरी संघटनेच्यावतीने शालेय विद्यार्थी व प्रवासी यांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी व एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काढलेल्या मोर्चात महिला, विद्यार्थी व प्रवासी मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते. मनाई आदेश असल्यामुळे मंगेश तळवणेकर, मनसेचे राजू कासकर, कारिवडे सरपंच अपर्णा आनंद तळवणेकर, शिरशिंगे सरपंच रेखा घावरे, सामाजिक कार्यकर्ते आनंद तळवणेकर यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. पण आता काही गावात एसटी सुरु झाल्यामुळे सर्वांची गैरसोय दूर झाली आहे. त्यामुळे गुन्हे दाखल झाले याचे दु:ख नाही. प्रवासी, शालेय विद्यार्थी, छोटे-मोठे भाजीपाला व्यावसायिक महिला-भगिनी यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसत आहे, त्यातच आमचे पाचही जणांचे समाधान आहे.
शिरशिंगे येथे एसटी सूरू करण्यासाठी सरपंच रेखा घावरे, कालिका मंदिर गाडी सूरू करण्यासाठी कारिवडे सरपंच अपर्णा आनंद तळवणेकर यांनी विशेष प्रयत्न केले. दरम्यान, शिरशिंगे येथे एसटी वाहक व चालक यांचे सरपंच रेखा घावरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी राजश्री पेडणेकर, माधुरी घावरे, मिना लाड, जयश्री घावरे, संजीवनी घावरे, हर्षदा पेडणेकर, विजया घावरे, निशा घावरे, सुभद्रा शिर्के, वनिता दळवी, सत्यवती शिर्के, शितल घावरे, रोहीणी घावरे, श्रेया शिर्के, दिपिका शिर्के, सुस्मिता पेडणेकर, लक्ष्मी पेडणेकर, संध्या चव्हाण, सुस्मिता घावरे उपस्थित होत्या. ज़िल्ह्यातील सर्व गावात एसटी पूर्ववत होऊन ग्रामस्थांची गैरसोय लवकरच दूर व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
