मराठा समाज,छत्रपती शिवाजी चौक मित्रमंडळाच्या भूमिकेकडे लक्ष
*⚡कणकवली ता.१०-:* कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतराचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच पुतळा नेमका कुठे स्थलांतरित करावा याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली ओरोस येथे पार पडलेल्या बैठकीत सदरचा पुतळा प.स.लगतच्या 18 गुंठे शासकीय जागेत स्थलांतरित करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी दिले असल्याने आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या शासकीय जागेत गेली कित्येकवर्षे रोजी रोटीसाठी असलेल्या व्यवसायिकांवर या निर्णयामुळे कुऱ्हाड कोसळण्याची भीती व्यवसायिकांनमधून व्यक्त केली जात आहे. पुतळा प्रश्न पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला असून पालकमंत्र्यांनी 2 दिवसात या जागेची आर्किटेकच्या माध्यमातुन पाहणी करत प्लॅन तयार केला जाणार असल्याचे सांगितले.तसेच 16 जाने रोजी आपण स्वतः त्या ठिकणी येऊन सर्वानुमते याबाबत निर्णय घेणार असल्याचे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.त्यामुळे आता मराठा समाज कार्यकर्ते,छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळ व स्थानिक व्यवसायिक नेमकी काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून राहिले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा कणकवली येथील पुतळा महामार्ग चौपदरीकरणात बाधित झाला असून सदर पुतळ्याचे पर्यायी जागेत स्थलांतर करावे अशी मागणी गेली तीन ते साडेतीन वर्षे सुरू आहे.महामार्ग ठेकेदाराने पुतळा सर्व्हिस रोड मधोमध जैसे थे स्थितीत ठेवल्याने याप्रश्नी छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळाने व सकल मराठा समाजाने पुतळा स्थलांतराची मागणी लावून धरली होती यासंसंधरबात कणकवली न.प.येथे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या पुढाकाराने आयोजित सभेत पालकमंत्र्यांनी आतापर्यंत थांबलात तसे अजून एक महिना थांबा असा शब्द दिला होता मात्र दोन महिने कोणतीच कार्यवाही न झाल्याने अखेर काल रविवारी रात्री मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री सामंत यांना पुतळा ठिकाणी वस्तुस्थिती जाणून दिली त्यानंतर पालकमंत्र्यांनी आज ओरोस येथे बैठक आयोजित करत पुतळा स्थलांतराचा प्रश्न हाताळला.
शासनाच्या मालकीच्या असलेल्या 18 गुंठे जागेतच पुतळा करण्यावर आजच्या बैठकीत पालकमंत्र्यांचा रोख दिसला. त्यानुसार येत्या दोन दिवसात या 18 गुंठे जागेची आर्किटेक मार्फत पाहणी करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे समजते. तसेच या 18 गुंठे जागेत असलेल्या व्यवसायिकांना त्याच ठिकाणी शासकीय जागेत पुनर्वसन करण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा करण्यात आली. त्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा स्थलांतरणाचा प्रश्न पुन्हा एकदा लांबणीवर तर पडलाच आहे. पण आता नव्याने या 18 गुंठे जागेतील व्यवसायिकांना स्थलांतरित करून पुनर्वसन करण्याचा मुद्दा येत्या काळात वाद चिगळण्याची शक्यता आहे. तसेच जर 18 गुंठे शासकीय जागा पूर्णता मोकळी केली गेल्यास या जागेत असणाऱ्या सध्याच्या व्यावसायिकांवर देखील संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य – दिव्य स्मारक करण्याच्या मुद्द्याला कुणाचाच विरोध नाही. तसा विरोध होण्याची शक्यताही नाही. तर मराठा समाजाच्या वतीने 19 जानेवारी पूर्वी पुतळा स्थलांतरणची आग्रही भूमिका घेतली. ओरोस येथे झालेल्या या बैठकीत पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, शिवसेना नेते संदेश पारकर, सतीश सावंत, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे,अधीक्षक अभियंता छाया नाईक, मराठा समाजाचे भाई परब,सुशांत नाईक,सुशील सावंत, बबलू सावंत,महेश सावंत, किशोर राणे, तेजस राणे,महेंद्र सांब्रेकर,अशोक करंबेळकर,सोनू सावंत,आनंद पारकर,ज्ञानेश्वर दिपणाईक,अनंत पारकर,राजेंद्र पेडणेकर, नगरसेवक ऍड. विराज भोसले, राजू आजगावकर आदी उपस्थित होते.
