ओझर विद्यामंदिरमध्ये ‘राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम’ संपन्न

*⚡मालवण ता.१०-:* जिल्हा क्षयरोग केंद्र, सिंधुदुर्ग, या शाखेच्या मालवण विभागाच्यावतीने ‘राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम’ कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिर या प्रशालेमध्ये घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाचे मालवण विभागाचे मुख्य आरोग्य पर्यवेक्षक- मनोजकुमार मालंडकर यांनी क्षयरोग दुरीकरणाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुख्य आरोग्य पर्यवेक्षक- मनोजकुमार मालंडकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानामध्ये क्षयरोग प्रसाराची कारणे, क्षयरोगाची लक्षणे, क्षयरोगावरील उपाय आणि क्षयरोग दुरीकरणामध्ये विद्यार्थ्यांची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्या समवेत आरोग्यविषयक मार्गदर्शन करणारे सदानंद मालंडकर यांनी विद्यार्थ्यांना क्षयरोग व कोविड १९ या आजाराबाबत घ्यावयाची दक्षता याविषयी मार्गदर्शन केले. व्याख्यानानंतर लगेचच विद्यार्थ्यांसाठी ‘क्षयरोग दुरिकरण’ या विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक निष्ठा कांबळी, द्वितीय आर्या पारकर तर तृतीय क्रमांक वसंत राणे याने प्राप्त केला.

उत्तेजनार्थ म्हणून रोहीत परब, दीक्षा कांबळी आणि सरिता परब यांनी यश संपादन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना आरोग्य विभागामार्फत प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी ‘क्षयरोग दुरीकरण’ या विषयावर रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार असल्याचेही मनोजकुमार मालंडकर यांनी सूतोवाच केले. या कार्यक्रमासाठी ओझर विद्यामंदिरचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शिक्षक पांडुरंग राणे यांनी मार्गदर्शकांचे व उपस्थितांचे आभार मानले.

You cannot copy content of this page