चार जागांसाठी तीन उमेदवार रिंगणात
*⚡कुडाळ ता.१०-: कुडाळ नगरपंचायतच्या चार जागांपैकी सद्य स्थितीत ३ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी १४ उमेदवारांपैकी ३ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने ११ उमेदवारांमध्ये ही निवडणूक होणार आहे. तर प्रभाग १६ मधील भाजप उमेदवाराचे निधन झाल्याने त्या प्रभागातील निवडणुकीबाबत अद्याप कोणताही निर्णय निवडणूक आयोगाने कळवला नसल्याने ही निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा कुडाळ पंचायत समितीचे माजी सभापती सुनील भोगटे यांनी आपला उमेदवारी अर्ज प्रभाग क्रमांक १७ मधून मागे घेतला आहे.
प्रभाग क्रमांक १७ मधून काँग्रेस उमेदवार ऋषिकेश कांबळी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे क्रमांक १७ मध्ये आता एकास एक लढत होणार आहे. शिवसेना व भाजप यांच्यात काटे की टक्कर होईल. प्रभाग क्रमांक ३ मधून भाजपा बंडखोर उमेदवार नेत्रा नागेश नेमळेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. या ठिकाणीही एकास एक लढत होणार आहे.
प्रभाग क्रमांक १६ मधील भाजप उमेदवार सुधीर चव्हाण यांचे दोन दिवसापूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यामुळे या निवडणुकी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे याबाबत सहायक निवडणूक निर्वाचन अधिकारी नितीन गाढवे यांना विचारले असता, त्यांनी आम्ही तात्काळ राज्य निवडणूक आयोगाला याबाबत कळविले असून त्यांचा निर्णय आल्यानंतरच याबाबत निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले. त्यामुळे सध्या तीन प्रभागातील निवडणुकीची प्रक्रिया सुरू राहील मात्र प्रभाग क्रमांक १६ मधील निवडणूक प्रक्रिया ही राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतरच निर्णय घेण्यात येणार आहे.
