गावातील शुद्ध पाण्यावर असणार आता महिलांची नजर

फिल्ड टेस्ट किट द्वारे पाण्याची गुणवत्ता तपासण्याचे प्रत्येक ग्रामपंचायतीतील पाच महिलांना देण्यात आले ऑनलाईन प्रशिक्षण

गावातील शुध्द पाण्यावर आता गावातील महिलाची नजर असणार आहे. फिल्ड टेस्ट किट (FTK) व्दारे पाण्याची गुणवत्ता तपासण्याबाबत जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीतील प्रती ग्रामपंचायत पाच महिलांना जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जिल्हा परिषद सिंधूदुर्ग यांच्या वतीने ऑनलाईन प्रशिक्षण नुकतेच देण्यात आले. जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घराला नळजोडणी देण्याबरोबरच गावात शुध्दपाण्याचा पुरवठा करणे हा उद्देश आहे. मा. श्रीम. आर. विमला, अभियान संचालक, राज्य पाणी व स्वच्छता मिशन, यांच्या सुचनेप्रमाणे जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद यांच्या वतीने जिल्हा सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील 5 महिलाची ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन निवड करण्यात आली होती. या महिलांना दिनांक 22 डिसेंबर 2020 ते 29 डिसेंबर 2020 या कालावधीत 19 बॅच तयार करुन ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील महिलांना गावातील सार्वजनिक व खाजगी स्त्रोत यांची माहिती देण्यात आली. तसेच पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताची निगा अशी राखावी व स्वच्छता सर्वेक्षण कार्यक्रम, पाणी गुणवत्ता विषयक तपासणी, फिल्ड टेस्ट किट चा वापर कसा करावा? त्याचा वापर करुन कशी पाणी तपासणी केली जाते. तसेच सदर किट कसे हाताळावे याबाबत माहिती देण्यात आली. पाणीची गुणवत्ता ढासळल्यास आरोग्यावर काय परिणाम होतो ? पिण्याच्या पाण्याचे शुध्दीकरण कसे करावे, याबाबत माहिती या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातुन देण्यात आली. या प्रशिक्षण कार्यक्रमांत जिल्ह्यातील सुमारे दोन हजार महिलांनी सहभाग घेतला होता. जिल्हा पाणी गुणवत्ता निरिक्षक श्री. निलेश मठकर व पाणी गुणवत्ता सल्लागार श्री. नागेश तोरस्कर यांनी उपस्थित महिलांना ऑनलाईन प्रशिक्षण दिले आहे.

You cannot copy content of this page