सावंतवाडी उपज़िल्हा रुग्णालयाला अद्ययावत रुग्णवाहिका द्या

देव्या सुर्याजी यांचे आमदार दीपक केसर यांना निवेदन

सावंतवाडी : येथील उपजिल्हा रुग्णालयाकडे अद्ययावत व्हेंटिलेटर ‘१०८’ रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने गैरसोय होत आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम पाटील यांच्याकडे केली आहे.

सूर्याजी यांनी निवेदनात म्हटले आहे की, सावंतवाडी शहराच्या आजूबाजूला बरीच गावे असल्याने रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच गंभीर रुग्णांना गोवा-बांबोळी रुग्णालयावर अवलंबून राहावे लागत आहे. अशावेळी ब-याच रुग्णांना रुग्णवाहिकेअभावी प्राण प्राण गमवावे लागत आहेत. सावंतवाडी तालुक्याला व्हेंटिलेटर अॅम्ब्युलन्ससाठी ओरोस किंवा देवगडच्या १०८ अॅम्ब्युलन्सची वाट पाहत राहावी लागते. या रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्यास धोका वाढतो व रुग्ण दगावण्याची शक्यता वाढते. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय हे ज़िल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला तातडीने अद्ययावत व्हेंटिलेटर १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी केली आहे.

दरम्यान, आमदार केसरकर यांनी या मागणीची तात्काळ दखल घेऊन या संदर्भात शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्याशी संपर्क साधून तात्पुरत्या स्वरूपात जिल्ह्यातील १०८ (ALS) अॅम्ब्युलन्स सावंतवाडी उपज़िल्हा रुग्णालयाला उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगितले. तसेच सावंतवाडी तालुक्यासाठी अत्यंत गरज असल्याने लवकरच व्हेंटिलेटर अॅम्ब्युलन्स सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.

You cannot copy content of this page