पियाळी नदीत सिलिका वॉशिंगचे गढूळ पाणी

जन आंदोलन उभारणार;असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांचा इशारा

*⚡कणकवली ता.०४-:* कणकवली तालुक्यातील असलदे-पियाळी नदीचे पाणी पुन्हा एकदा गढूळ झाल्याने बऱ्याच गावांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. सिलिका वाशिंग केलेले पाणी नदीत सोडले जात आहे, त्याला जबाबदार कोण? त्यांच्यावर तातडीने कारवाई करा, अशी मागणी करुनही प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. याबाबत वारंवार आवाज उठविला आहे तरीही सबधितांवर कारवाई केव्हा करणार? असा सवालही असलदे सरपंच तथा भाजपा तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर यांनी केला आहे.

कणकवली तालुक्यातील नांदगाव, असलदे, कोळोशी व हडपीड, तोंडवली-बावशी तसेच कासार्डे या गावात पियाळी नदीवरुन नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. या असलदे तावडेवाडी पियाळी नदीचे पाणी गेल्या महिन्यात असाच प्रकार घडला होता.आता पुन्हा एकदा बऱ्याच दिवसांच्या अंतराने नदीपात्रात वाळूच्या गढूळ पाण्यामुळे दूषित झाले आहे. त्यामुळे वरील सर्व गावांमध्ये नळाचे पाणीही गढून झाले आहे .त्यामुळे या गावांमध्ये हे नळाचे गढूळ पाणी वापरल्याने गावातील सर्वच नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याबाबत संबधी ग्रा. पं. ने कणकवली तहासिलदारांकडे पत्रव्यवहार करूनही कोणत्याही प्रकारे दखल घेतलेली नाही. जनतेच्या आरोग्याशी खेळू नका. बरीच जनता हे पाणी पिण्यासाठी वापरत आहे. तेव्हा लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न असल्याने आपण यात गांभीयाने लक्ष द्यावे. संबंधितांना नदीपात्रात वाळूचे पाणी सोडण्यास प्रतिबंध करावे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा असलदे सरपंच तथा भाजपा तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर यांनी दिला आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी याबाबत पंचक्रोशीतील सरपंच व ग्रामस्थांचे एक दिवसाचे उपोषण झाले होते. यावेळी पुन्हा असे नदीचे पाणी गढूळ होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असे आश्वासन दिले होते. तसेच मागील कणकवली पंचायत समिती मासिक सभेत यावर बरीच चर्चा झाली होती. नांदगाव पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके यांनी हा मुद्दा उपस्थित करून विविध प्रश्न विचारून यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली होती. परंतु त्याची दखल घेतल्याचे अद्यापही दिसून आलेले नाही. यामुळे यावर आता जन आंदोलन उभारले जाणार असल्याचे पंढरी वायंगणकर यांनी सांगितले आहे.

You cannot copy content of this page