पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे : चार जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी
*⚡ओरोस ता.०१-:* खर्येवाडी येथील सिध्दी अॅटोमोबाईल पेट्रोल पंपावर ५७ हजार रुपयाची चोरी करुन मुंबईकडे पळून जाणाऱ्या ५ आरोपींना पोलिसांनी अवघ्या दोन तासात करुळ तपास नाक्यावर ताब्यात घेतले. रोख ६१ हजार ५५० रुपयांसह, वेगवेगळ्या कंपनीचे ७ लाख ३९ हजार ५०० रुपये किंमतीचे २९ मोबाईल, ४ लाख किंमतीची मारुती सुझुकी सिलेरिओ (क्र एम.एच ०४ केएफ ७०४८) असा एकूण १२ लाख १ हजार ५० रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला, अशी माहिती पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.
आज सकाळी ७.३० च्या सुमारास खर्येवाडी येथील सिध्दी ॲटो मोबाईल पेट्रोल पंपावर सिएनजी गॅस भरण्याच्या निमित्ताने मारुती सिलेरीओ वाहनातून आलेल्या ५ जणांनी पंपावरील ५७ हजार रुपये चोरुन घेवून मुंबईच्या दिशेने पळून गेल्याची माहिती नियंत्रण कक्षास प्राप्त झाली. पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व तपास नाक्यांना सतर्क केले. वैभववाडीचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी प्रथम करुळ तपास नाक्यांवरील अंमलदार यांना सतर्क करुन बॅरिकेटींग करुन वाहन अडथळे निर्माण करण्यास सांगितले. त्यानंतर ते स्वत: पथकासह रस्त्यावर थांबून निगराणी करीत असताना वैभववाडी येथील संभाजी चौक येथे नियंत्रण कक्षाकडून प्राप्त क्रमांकांची सिलेरिओ ही दिसून आली. या वाहनाला थांबविण्याचा प्रयत्न केला, परंतु , ती वेगात कोल्हापूरच्या दिशेने जावू लागल्याने पोलीस निरीक्षक श्री जाधव यांनी क्षणाचा विलंब न करता या वाहनाचा चालक हरिश्चंद्र जायभाय यांच्या मदतीने पाठलाग करत करुळ तपास नाक्यावरील अंमलदारांना सतर्क केले.
पोलीस कॉन्स्टेबल वसंत कांबळे व समीर तांबे यांनी केलेल्या वाहन अडथळयाच्या मदतीने वाहनातील ५ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत विक्रोळी पार्क साईट व घाटकोपर मुंबई येथील ५ जणांना ताब्यात घेतले असून पैकी २ हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुध्द मुंबई व ठाणे येथील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या पाच जणांना ४ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिला. पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे,अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली वैभववाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अतुल जाधव समीर तांबे, वसंत कांबळे, पोना मारुती साखरे, चालक हरिश्चंद्र जायभाय, पोकॉ मोहन राणे, पोकॉ अजय बिल्पे पोकॉ राहूल तळसकर, नियंत्रण कक्ष अधिकारी पोहेकॉ अनिल भिसे, पोना अशिष जामदार, मपोना श्रेया लाड यांनी ही कारवाई केली आहे. पुढील तपास सिंधुदुर्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावळे करीत आहेत. या पत्रकार परिषदेला वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनील धनावडे, सपोनी बळीराम सुतार महेंद्र घाग उपस्थित होते.
