त्यामुळे ते चुकीचे आरोप करीत आहेत;राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर यांचा आरोप
*⚡दोडामार्ग ता.२६ सुमित दळवी-:* समाजकारण, राजकारण,शैक्षणिक क्षेत्रात सुरेशभाई दळवी हे नाव नेहमीच पुढे राहिले आहे,हे संपूर्ण सिंधुदुर्ग वासीयांना माहीत आहे.मात्र या संपूर्ण विषयाची माहिती घेताना अतुल काळसेकर यांनी मात्र डोळ्यांवर पट्टीच बांधली असावी.भाई अनेक वर्षे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, तर सहा वर्षे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी कामकाज पाहिले आहे. शैक्षणिक संस्था उभारून गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
तर निवडणूक लढवत असताना भाईनी कधीच कुणावर टिका केली नाही.सुरेशभाई दळवी यांच्या विरोधात निवडणूक लढवत असलेले अतुल काळसेकर यांनी मात्र मर्यादा ओलांडली. निवडणूक कुठल्या पक्षातून लढवावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे,परंतु एखाद्याच्या प्रकृतीबाबत टीका करण्याचा नैतिक अधिकार काळसेकर यांना नाही. गेल्या सहा वर्षांत कोणतेही काम न केलेले काळसेकर हे फक्त मतदारांची दिशाभूल करू पाहत आहेत, आजारपण कधी कुणाला सांगून येत नाही व ते कुणाला चुकतही नाही. अतुल काळसेकर यांना फक्त त्यांचा पराभव समोर दिसत आहे. त्यामुळे ते पराभवाच्या नैराश्यातून टीका करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँक लहान मुलांच्या हातात देऊन बँकेचा सर्कस पॉईंट करायचा नाही आहे,आमच्या नेत्यावर अशी टीका करणाऱ्या काळसेकर यांचा आम्ही राष्ट्रवादी तर्फे जाहीर निषेध करतो,असे राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर यांनी दोडामार्ग येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संदीप गवस,शहराध्यक्ष सुदेश तुळसकर, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष दीपक जाधव,गौतम महाले,सागर नाईक आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
