*स्कुबा व्यवसायिकांमध्ये खळबळ
*💫मालवण दि.२९-:* वेंगुर्ला येथील प्रादेशिक बंदर कार्यालयाच्या अधिकारी वर्गाकडून मालवण समुद्र किनाऱ्यावर सरप्राईज इंस्पेक्शन साठी भेट देत १२ स्कुबा डायविंग व्यावसायिकांवर कारवाई करत त्यांचे सिलेंडर ताब्यात घेतले अचानक झालेल्या या कारवाईमुळे स्कुबा व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली. स्कुबा साठी पर्यटकांची प्रवासी जल वाहतूक करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे न आढळल्याने कारवाई केली गेल्याचे बंदर अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र जर कारवाई प्रवासी वाहतुकीचे कागदपत्र नसतील म्हणून केली गेली असेल तर स्कुबाचे सिलेंडर का व कोणत्या अधिकारात जप्त करण्यात आले असा सवाल स्कुबा व्यावसायिक अन्वय प्रभू यांनी अधिकाऱ्यांना विचारत बंदर विभागाने सिलेंडर चोरल्याचा गंभीर आरोप केला. सिलेंडर का जप्त केले याचे लेखी कारण द्यावे, अन्यथा सिलेंडर चोरल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार करून अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करू तसेच न्यायालयातही दाद मागू असा इशारा यावेळी अन्वय प्रभू यांनी दिला. वेंगुर्ले येथील प्रादेशिक बंदर कार्यालयातील सहाय्यक बंदर निरीक्षक श्री.उमेश महाडिक, किरणपाणी आणि वेंगुर्ला सहाय्यक बंदर निरीक्षक श्री.अनंत गोसावी यांनी मालवण बंदर कार्यालयाचे दोन कर्मचारी यांच्यासमवेत मालवण किनारपट्टीवर सरप्राईज इंस्पेक्शन मोहीम राबवित अचानक स्कुबा व्यावसायिकांची तपासणी सुरू केली. या तपासणीत व्यवसायासाठी आवश्यक कागदपत्रे न सापडल्याप्रकरणी या पथकाकडून चिवला बीच येथील २ तर मालवण किनाऱ्यावरील १० स्कुबा डायविंग व्यवसायिकांवर कारवाई करत त्यांचे स्कुबा सिलेंडर ताब्यात घेतले अचानक झालेल्या या कारवाई मुळे स्कुबा व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली. यामुळे संतप्त बनलेल्या स्कुबा व्यावसायिक अन्वय प्रभू, हेमंत रामाडे, एजाज मुल्ला यांनी मालवण बंदर कार्यालयात धडक देत अधिकारी महाडिक व गोसावी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी मालवण बंदर निरीक्षक सौ. सुषमा कुमठेकर उपस्थित होत्या. यावेळी अन्वय प्रभू यांनी कारवाई कशासाठी केली व सिलेंडर का जप्त केले याची लेखी कारणे द्यावीत अशी मागणी अधिकाऱ्यांकडे केली. यावर अधिकारी श्री. गोसावी यांनी ही कारवाई प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. सुरज नाईक यांच्या आदेशांवरून अनधिकृत प्रवासी जल वाहतूक केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याचे सांगत स्कुबा साठी पर्यटकांची बोटीतून वाहतूक करताना जल प्रवासासाठी काही आवश्यक कागदपत्रे संबंधितांकडे सापडून न आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे सांगितले.
