*सुरेश बापर्डेकर यांचा सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा
मालवण (प्रतिनिधी) वायरी तारकर्ली रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न व या रस्त्याचे रुंदीकरणासह हॉटमिक्स डांबरीकरण व्हावे या मागणी बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने आश्वासन देऊनही कोणतीही कार्यवाही न केल्याच्या निषेधार्थ तारकर्ली येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश बापर्डेकर यांनी २९ डिसेंबर रोजी तारकर्ली रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात बसुन आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत या रस्त्यावरील पर्यटकांची वाहने व पर्यटक यांचे कारण देऊन परत एकवेळ मुद्दत मागून दि. ४ जानेवारी पासून कामाला सुरुवात करणार असल्याच्या आश्वासनाचे लेखी पत्र सुरेश बापर्डेकर यांना सादर केले आहे. त्यामुळे बापर्डेकर यांनी आपले उपोषण तात्पुरते स्थगित करून पुढे ढकलले आहे. मात्र दिलेल्या तारीखला काम चालू झाले नाही, तर लगेचच कोणतीही सूचना न देता रस्त्यावरील खड्ड्यात उग्र उपोषण आंदोलन केले जाईल, असा इशारा सुरेश बापर्डेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनाद्वारे केले आहे.
