उषा परब यांची कोमसापच्या नियामक मंडळावर नियुक्ती

सावंतवाडी ता.२२ : अलीकडेच स्थापन झालेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय नियामक मंडळावर सावंतवाडी येथील ज्येष्ठ साहित्यिका, नाटककार, कादंबरीकार, कवयित्री तसेच अनेक पुरस्कार प्राप्त लेखिका उषा परब यांची निवड झाली आहे.

या मंडळाचे अध्यक्ष मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर असून आमदार संजय केळकर, महाराष्ट्र महिला वित्त मंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे, अण्णासाहेब सावंत को-ऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमन शोभा सावंत, प्राचार्य अशोक ठाकूर हे अन्य सभासद आहेत. लेखिका उषा परब यांनी यापूर्वी महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेच्या जिल्हाध्यक्ष, केंद्रीय समिती प्रमुख, आरती मासिक, चिंतामणी साहित्य संस्कृती प्रकाशन संस्था, सचिव, वाचनालय, इनरव्हील क्लब यासारख्या अनेक संस्थांवर महत्त्वपूर्ण व जबाबदारीची भूमिका बजावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच सावंतवाडी येथील कोमसापच्यावतीने आयोजित केलेले राज्यस्तरीय तीन दिवसांचे महिला साहित्य संमेलन व गेली सोळा वर्षे यातूनच आरती मासिक व इतर संस्थांच्या सहकार्याने त्या आयोजित करीत असलेल्या निमंत्रितांच्या विभागीय कवयित्री संमेलनात महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील नामवंत कवयित्रीसोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक नवोदित कवयित्रींना व्यासपीठ मिळवून देण्याचा त्या प्रयत्न करीत आहेत. नवोदितांनाही अनेक कथा, कविता, नाट्य कार्यशाळांचे आयोजन आणि मार्गदर्शन त्यांनी केलेले आहे. २००९ साली भारतात मुंबई येथे भरलेल्या विविध भाषिक स्त्री लेखकांच्या जागतिक परिषदेत त्यांच्या नाटकाची निवड, चर्चा आणि प्रयोगही झाला. राज्यपातळीवरील तसेच देशपातळीवरील परिसंवादातून त्यांचा असलेला सहभाग, गोवा, बेळगाव येथील महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान यांसारख्या संधीमधून त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे, राज्याचे आणि देशाचेही प्रतिनिधित्व केले आहे. ‘तिचं आभाळ’ व ‘गर्भरेशीम’ या काव्यकथा सादरीकरणाच्या स्वतंत्र कार्यक्रमातून गेली कित्येक वर्ष महाराष्ट्र, गोवा, बेळगाव येथील विविध ठिकाणी प्रभावी सादरीकरण करून त्या साहित्यसेवा करीत आहेत. नियामक मंडळावरील त्यांच्या नियुक्तीसाठी त्यांचे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक अशा सर्व स्तरांवरून अभिनंदन व स्वागत होत आहे.

You cannot copy content of this page