माजी मुख्यमंत्री – खासदार नारायण राणे उद्या चिपी विमानतळाला देणार भेट

*💫वेंगुर्ला दि.२७-:* महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे नेते आणि विद्यमान खासदार नारायण राणे सोमवार २८ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता वेंगुर्ले तालुक्यातील चिपी विमानतळ प्रकल्पाला भेट देणार आहेत. या भेटीमध्ये ते विमानतळाच्या कामाचा आढावा संबंधित अधिकाऱ्यांकडून घेऊन विमानतळाची पाहणी करणार आहेत, अशी माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी दिली. वेंगुर्ले तालुक्यातील वजराट येथील ग्रामपंचायत नूतन इमारतीचे उद्घाटन सकाळी ११ वाजता नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमानंतर ते चिपी येथे भेट देणार आहेत. चिपी येथे हा विमानतळ प्रकल्प नारायण राणे यांनी आणला आणि बहुतांशी काम पूर्ण करून घेतले. मात्र महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर या विमानतळ प्रकल्पाचे काम रखडले, माजी गृहराज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी एक वेळा विमानातून गणपती आणला आणि विमानतळ सुरू झाल्याचे जाहीर केले, परंतु आवश्यक परवाने पूर्ण नसल्याने आणि विमानतळावरील कामे अपूर्ण असल्याने विमानसेवा मात्र सुरू झाली नाही. या विमानतळावरील कामे अजूनही अपूर्ण असताना पुन्हा एकदा विमानतळावर विमान उतरणार अशा वल्गना सत्ताधाऱ्यांकडून होत आहेत. मात्र नुकत्याच एका कार्यक्रमात नारायण राणे यांनी चिपी येथील विमानतळावर आपणच विमान उतरविणार असे जाहीर केले होते. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर नारायण राणे उद्या या विमानतळ प्रकल्पाला भेट देणार असून ते कोणती भूमिका मांडतात याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे.

You cannot copy content of this page