निवती रस्त्याचे काम रखडल्याने ग्रामस्थ उपोषणाच्या पवित्र्यात!

*💫मालवण दि.२७-:* निवती रस्त्याच्या उर्वरित कामास सुरुवात न केल्यास २९ डिसेंबर पासून कुडाळ येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यालयात समोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा निवती ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे. म्हापण ते निवती या रस्ता कामाला २०१९ मध्ये सुरुवात करण्यात आल्यानंतर जेमतेम दोन महिने काम केल्यावर पावसाळा सुरु झाल्यामुळे काम बंद करण्यात आले. पावसाळा संपल्यावर हे काम सुरु करणे अपेक्षित होते पण ते सुरु न केल्याने निवती ग्रामस्थांनी ३० डिसेंबर २०१९ रोजी म्हापण निवती रस्त्यावर रास्तारोको आंदोलनाचा इषारा दिला. त्यावेळी संबंधित अधिकारी,ग्रामस्थ व संबंधित ठेकेदार याना निवती पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले.त्या ठिकाणी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेचे कार्यकारी अभियंता व ग्रामस्थ उपस्थित राहिले पण ठेकेदार उपस्थित राहिला नाही. उपस्थित अभियंत्यांनी आजपासून कामाला सुरुवात करण्यात आली असून काम पूर्ण होईपर्यंत आता थांबणार नाही.असे लेखी आश्वासन दिले.तेव्हा निवती पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अमोल साळुंखे यांच्या विनंतीवरून रास्तारोको आंदोलन स्थगित करण्यात आले. त्यानंतर खडीकरण केलेल्या रस्त्यावर डांबरीकरणाचा पहिला थर देऊन पावसाळा सुरु झाल्याने काम बंद करण्यात आले.पावसाळा संपल्यावर उर्वरित रस्त्याचे काम सुरु होणे अपेक्षित होते.पण ते सुरु न झाल्याने ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदारा जवळ विचारणा केली असता आठ दिवसात काम सुरु करतो असे उत्तर मिळते. निवती हे एक पर्यटन गाव असल्याने पर्यटकांची या रस्त्यावरुन सतत वर्दळ असते. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे पर्यटन व्यवसाय व वाहतुकीवर विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे नाईलाजाने निवती ग्रामस्थांनी बेमुदत उपोषणाचा ईशारा दिला आहे.

You cannot copy content of this page