हरी खोबरेकर यांची निलेश राणेंवर टीका
*⚡मालवण ता.०३-:* माजी खासदार निलेश राणे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना यापूर्वी शिवसेनेने दोन वेळा पराभवाची धूळ चारली असून त्या पराभवाचे शल्य निलेश राणे यांना अजूनही आहे. म्हणूनच काही मर्जीतील कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी निलेश राणे बेताल वक्तव्य करत सुटले आहेत. वैभव नाईक हे निवडणुकांच्या वेळी राणेंना माहिती पुरवायचे, असे निलेश राणे म्हणत असतील तर त्यांनी त्या त्याबाबतचे पुरावे आणि संभाषण क्लिप सादर कराव्यात, दुध का दूध और पानी का पानी होऊन जाईल, असे आव्हान शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी आज पत्रकार परिषदेतून माजी खासदार निलेश राणे यांना दिले. मालवण शिवसेना शाखा येथे शिवसेना मालवण तालुकाप्रमुख व जि. प. सदस्य हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, नगरसेवक मंदार केणी, पंकज सादये, दीपा शिंदे, संमेश परब, युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, अमेय देसाई, संकेत मांजरेकर आदी व इतर उपस्थित होते. यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, सत्तेत असूनही जनतेच्या न्यायासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची धमक आम. वैभव नाईक यांच्यात आहे तशी शिकवणच आम्हाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली असल्याने शिवसैनिक असल्याचा आम्हाला अभिमान आहे. आम. नाईक यांचे कार्य बघूनच जनतेनेच त्यांना दोन वेळा निवडून दिले आहे. निलेश राणे यांना आपल्या व नारायण राणे यांच्या पराभवाचे शल्य अजूनही आहे. आम. नाईक हे पुन्हा निवडून येण्याची भीती राणे यांना आहे. म्हणूनच ते बेताल वक्तव्य करत आहेत, मात्र आमदार नाईक व खासदार विनायक राऊत हे निलेश राणे यांच्या वक्तव्यांकडे ढुंकूनही पाहत नाहीत, जनताही राणेंच्या वक्तव्यांना कंटाळल्याचे खोबरेकर म्हणाले.
आम. नाईक यांनी केलेली विकासकामे जनतेला माहीत आहेत. शिवसेनेवर टीका करण्यासाठीच राणे मंडळींना भाजप मध्ये प्रवेश दिला गेला आहे तर भाजपमधील काही जण मात्र राणे मंडळींना कंटाळूनच शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. येत्या निवडणुकांमध्ये शिवसेनाच विजयी होईल याबाबत आम्हाला आत्मविश्वास आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका ही शिवसेनेच्याच हातात असेल. मालवणचा नगराध्यक्ष पुन्हा शिवसेनेचाच असेल त्यामुळे सत्तेची सर्व बलस्थाने गेल्यावर राणेंनी कुठे जायचे हे त्यांनी ठरवावे असेही हरी खोबरेकर म्हणाले.
