*⚡वेंगुर्ला ता.०१-:* अवकाळी पावसामुळे वेंगुर्ला तालुक्यातील आंबा, काजू व भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कृषि विभागाने सदर नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत व शासनाने शेतकरी, बागायतदार यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, असा ठराव वेंगुर्ला पंचायत समितीच्या मासिक सभेत करण्यात आला. वेंगुर्ला पंचायत समितीची मासिक सभा पंचायत समितीच्या नुतन सभागृहात सभापती अनुश्री कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी उपसभापती सिध्देश परब, सदस्य गौरवी मडवळ, साक्षी कुबल, स्मिता दामले, सुनिल मोरजकर, मंगेश कामत, गटविकास अधिकारी उमा पाटील उपस्थित होत्या. गेले काही दिवस वेंगुर्ला तालुक्यात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात पडत आहे. मठ येथे चक्रीवादळ होवून घर, गोठे, आंबा, काजू तसेच इतर जंगली झाडाचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे येथील आंबा, काजू बागायतदारांनी आपल्या बागावर केलेल्या किटकनाशकांच्या फवारण्या फुकट गेल्या आहेत. तरी तालुक्यातील नुकसानीची पाहणी कृषि विभागाने तात्काळ करुन तहसिलदार यांना प्रस्ताव द्यावेत व शासनाने बागायतदाराना सरकसट नुकसान भरपाई द्यावी असा ठराव सुनिल मोरजकर यांनी मांडला. यावेळी सुनिल मोरजकर यांनी सेसमध्ये किती अनुदान शिल्लक आहे. १८-१९ मध्ये पंचायत समिती सेस अनुदान कीती आले, किती खर्च झाला याविषयी माहिती द्यावी अशी मागणी केली. सदर माहिती लेखा विस्तार अधिकारी (सांखिकी) यांना देता आली नाही. त्यामुळे साक्षी कुबल, स्मिता दामले, गौरवी मडवळ, सिध्देश परब यांनी सदर अधिका-यांच्या एकंदरीत कामाबद्दल नाराजी व्यक्त केली. सभागृहाची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप यावेळी मोरजकर यांनी केला. शेवटी या विषयासंदर्भात मिटिंग संपल्यानंतर संबंधित अधिकारी व सदस्य यांची बैठक घेण्याचे ठरले. अडथळा ठरत असलेला एखादा पोल हटवायचा असल्यास विजमंडळ पैसे घेते. मात्र आज अनेक शेतक-यांच्या शेतात विज मंडळाचे विद्युत पोल आहेत. तसेच ट्रान्सफार्मरहि आहेत. ट्रान्सफार्मरसाठी किमान अर्धा गुंठा जागा लागते. त्यामुळे अडथळा ठरत असलेले पोल हटविण्यासाठी जर विजमंडळ पैसे घेत असेल तर त्यांनी शेतक-यांच्या शेतात असलेल्या ट्रान्सफार्मर, पोल चे भाडे शेतक-यांना व रस्त्यालगत असलेल्या पोल व ट्रान्सफार्मरचे भाडे त्या त्या भागातील ग्रामपंचायतींना द्यावे अशी सुचनाही यावेळी करण्यात आली. या सभेस विज मंडळाचे अधिकारी किंवा प्रतिनिधी उपस्थित नसल्याबद्दलही नाराजी व्यक्त करण्यात आली. वेंगुर्ल्यात पाणी पुरवठा शाखा कार्यालय सुरु करण्यात यावे अशी सुचनाहि यावेळी करण्यात आली.
मासिक सभेत नुकसान भरपाईचा ठराव
