कणकवली नगरपंचायतचा देशात 67 वा क्रमांक
*⚡कणकवली ता.२१-:* देशातील पश्चिम विभागीय झोन मधून स्वच्छ सर्वेक्षणमध्ये कणकवली नगरपंचायत ला 67 वा क्रमांक मिळाला आहे.स्वच्छ सर्वेक्षणमध्ये केलेल्या कामाची पोचपावती कणकवली नगरपंचायतला मिळाली आहे. गेल्यावर्षी कणकवली नगरपंचायत चा स्वच्छ सर्वेक्षण मध्ये पश्चिम विभागीय झोन मध्ये 232 वा क्रमांक आला होता. यावर्षी कणकवली नगरपंचायतने स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत राबवलेले उपक्रम व स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत कचरा विलगीकरण व गार्बेज डेपोवर तयार केलेला कंपोस्ट खताचा प्रकल्प यासह अन्य अनेक मुद्द्यांवर केंद्रस्तरीय पथकाकडून पाहणी करण्यात आली होती. मार्च 2021 मध्ये केंद्रस्तरीय स्वच्छता मिशन च्या पथकाने कणकवली शहराची पाहणी करून हा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला दिला होता. त्यानुसार कणकवली नगरपंचायतची 67 व्या स्थानी निवड करण्यात आली आहे. नगरपंचायत स्तरातून कणकवली नगरपंचायत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्या स्थानी राहिली आहे. तर नगरपरिषद व नगरपंचायत स्तरामधून कणकवली नगरपंचायत सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिसऱ्या स्थानी राहिली आहे. कणकवली नगरपंचायतकडून कणकवली शहरातील स्वच्छतेबाबत राबविलेले उपक्रम व त्या अनुषंगाने केलेल्या उपाययोजना यामुळे कणकवली नगरपंचायत ने गरुड झेप घेतली असून केलेल्या कामाची पोचपावती कणकवली नगरपंचायत ला मिळाली आहे. कणकवली नगरपंचायतचे स्वच्छता कर्मचारी तसेच स्वच्छ सर्वेक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कामाला यश मिळाले आहे. कणकवली नगरपंचायतचे या यशाबद्दल कौतुक केले जात आहे.
