*⚡मालवण ता.२०-:* महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून यात मालवण तालुक्यातील २० ग्रामपंचायतीच्या रिक्त सदस्य पदासाठी पोट निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रे सादर करण्याची मुदत ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२१ अशी असून मतदान २१ डिसेंबर रोजी होणार आहे. तर मतमोजणी २२ डिसेंबर रोजी होणार आहे, अशी माहिती मालवणचे तहसीलदार अजय पाटणे यांनी दिली आहे. मालवण तालुक्यातील कातवड, कुंभारमाठ, देवबाग, देवली, महान, वेरळ, बिळवस, मर्डे, त्रिंबक, बांदिवडे बुद्रुक, बांदिवडे खुर्द, किर्लोस, पोईप, श्रावण, पळसंब, रामगड, सुकळवाड, हेदूळ, खोटले, वराड या २० गावांच्या ग्रामपंचायती मधील रिक्त सदस्य पदासाठी पोट निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशन पत्रे सादर करावयाची आहेत. दि. ७ डिसेंबर रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम मुदत दि. ९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजे पर्यंत असून ३ वाजल्यानंतर निवडणूक चिन्ह व निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. आवश्यक वाटल्यास मतदान दि. २१ डिसेंबर रोजी होणार आहे. तर मतमोजणी दि. २२ डिसेंबर रोजी होणार आहे, अशी माहिती तहसीलदार अजय पाटणे यांनी दिली आहे.
मालवण तालुक्यातील २० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
