मालवण तालुक्यातील धूप प्रतिबंधक कामांची निविदा काढण्याचा मार्ग मोकळा

*⚡मालवण ता.१५-:* मालवण तालुक्यातील धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांच्या कामाचे १२ लाख रुपये चाचणी शुल्क पुणे येथील सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशनकडे राज्य पतन विभागाने भरले असून यामुळे या कामांचे टेंडर काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत आमदार वैभव नाईक यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. मालवण तालुक्यातील धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांची अनेक कामे आमदार वैभव नाईक यांनी बजेट मध्ये मंजूर करून घेतली आहेत. कामांना प्रशासकीय मान्यता देखील मिळाली आहे. मात्र हे बंधारे सीआरझेड मुळे प्रलंबित होते. आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अर्थमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे बंधाऱ्यांच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार राज्य पतन विभागाकडून सर्व्हे करण्यासाठीचे १२ लाख ०२ हजार ४२० रु. चाचणी शुल्क सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन पुणे (CWPRS) यांना भरण्यात आले आहे. त्यामुळे आता बंधाऱ्यांच्या कामांना तांत्रिक मंजुरी व टेंडर प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये मालवण तालुक्यातील देवबाग येथे धूप प्रतिबंधक बंधारा बांधणे ४ कोटी, मेढा राजकोट येथे धूप प्रतिबंधक बंधारा बांधणे २ कोटी, तळाशील समुद्र किनारी श्री. सावळाराम धाकू चोडणेकर यांच्या घरापासून ते राजन चंद्रकांत कोचरेकर यांचे घरापर्यंत धूप प्रतिबंधक बंधारा बांधणे ३ कोटी, दांडी मोरेश्वर रांज येथे धूप प्रतिबंधक बंधारा बांधणे २ कोटी, तळाशील समुद्र किनारी राजन चंद्रकांत कोचरेकर यांच्या घरासमोर धूप प्रतिबंधक बंधारा बांधणे १ कोटी ५० लाख, हडी पाणखोल जुवा येथे संरक्षण बंधारा बांधणे २ कोटी, मसुरकर जुवा येथे धूप प्रतिबंधक बंधारा बांधणे ३ कोटी ४८ लाख, या कामांचा समावेश आहे. लवकरच या कामांची निविदा प्राक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे ही कामे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून ती लवकरच मार्गी लावण्यात यावी अशी आशा जनतेतून व्यक्त होत आहे

You cannot copy content of this page