सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी पतसंस्थेची योजना

शून्य टक्के डाऊन पेमेंटने वाहनाना मिळणार सीएनजी कर्ज

मालवण दि प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी पतसंस्थेने धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील रिक्षा व चारचाकी वाहनांना सीएनजी या नैसर्गिक व पर्यावरण पुरक इंधनाचे कीट बसविण्यासाठी शून्य टक्के ड्राऊन पेमेंट सुलभ हप्त्यांची कर्ज योजना समर्थ फायबर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केली आहे. या योजनेत अत्यंत कमी कागदपत्रांमधे कर्ज वितरणाची सुविधा संस्थेने सुरू केली आहे. शून्य टक्के डाऊन पेमेंट, पिग्मीतून पैसे भरण्याची सुविधा, फक्त सव्वाटक्का मासिक व्याजदर, १२, १८ आणि २४ हप्त्यात परतफेड तसेच दीपावली कालावधीत त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत (१९ नोव्हेंबरपर्यंत) ४,००० चा गॅस फ्री व आरटीओ नोंदणी फ्री अशी सवलत समर्थ फायबर यांच्याकडून मिळणार आहे. या योजनेचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष नितीन वाळके यांच्या हस्ते झाला. यावेळी व्यासपीठावर व्यापारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश वाळके, व्यापारी महासंघाचे कुडाळ तालुकाध्यक्ष श्रीराम शिरसाट, महासंघाचे संचालक द्वारकानाथ घुर्ये, समर्थ फायबरचे मालक हर्षद पाटील तसेच रिक्षा युनियनचे अध्यक्ष अविनाश पाटील, संस्थेचे सल्लागार अमित पंडित तसेच कोकण नाऊचे खाडे व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. भविष्यात इंधन दरवाढ, टंचाई आणि पर्यावरण हानीचा विचार करता, सीएनजी इंधनाशिवाय पर्याय नाही. रिक्षा व्यावसायिकांना जास्त फायदा कसा होईल, यादृष्टीने संस्था कटिबद्ध असल्याचे मत अध्यक्षांनी व्यक्त करत ही योजना प्रचंड यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला. गेली पंधरा वर्षे संस्था सतत अ वर्गात असून सभासदांना दहा टक्के डिव्हिडंड वाटप करते. संस्थेने आधुनिक संगणकीकरण करत बदलत्या वेगवान आव्हानांना सामोरे जात नवनवीन संकल्पना राबविल्या आहेत.

You cannot copy content of this page