मालवण दि प्रतिनिधी मालवण शहरातील फोवकांडा पिंपळ येथे एका रिक्षा चालकाने समोरून येणाऱ्या अल्टो कारला रिक्षा घासल्याने अल्टो कारचे नुकसान झाले. यामुळे रिक्षा चालक व कार चालक यांच्यात रस्त्यातच वाद झडल्याने या मुख्यमार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली. यावेळी स्थानिक नागरिकांच्या मध्यस्थीने हा वाद मिटल्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली. मालवण शहरातील फोवकांडा पिंपळ या नाक्यावरून आज सायंकाळी साडे चार वाजण्याच्या दरम्यान भरडच्या दिशेने जाणाऱ्या अल्टो कारला समोरून येणाऱ्या रिक्षा चालकाने हुलकावणी देत रिक्षा कारच्या जवळून नेल्याने रिक्षा कारला घासली गेली. यामुळे कारचे नुकसान झाले. यावेळी संतप्त झालेल्या अल्टो कार मधील तिघांनी रिक्षा चालकाला जाब विचारत नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. मात्र रिक्षाचालक रिक्षा मधून बाहेर येत नसल्याने त्यांचा संतापाचा पारा अधिकच चढला. सदर रिक्षाचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची चर्चा यावेळी नागरिकांमध्ये सुरू होती. या वादामुळे या मार्गावरील वाहतूक खोळंम्बली. यावेळी याठिकाणी पोलीस कर्मचारीही दाखल झाले. यावेळी स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. तर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
फोवकांडा येथे रिक्षा आणि अल्टो चा अपघात…
