*⚡वेंगुर्ला ता.२९-:* वेंगुर्ला राष्ट्रीय पेन्शन योजना (एन.पी.एस.) रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत आज (दि.२९) महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा सिंधुदुर्गच्यावतीने वेंगुर्ला पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आले. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन शाखा वेंगुर्ल्याचे अध्यक्ष गणेश बागायतकर, तालुका उपाध्यक्ष अनिल चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष संदीप गवस, कृषी विस्तार अधिकारी संदेश परब, पालकरवाडी ग्रामसेवक व्ही. जी. सावंत, केळुस ग्रामसेवक विवेक वजराटकर, परबवाडा ग्रामसेवक प्रविण नेमण, मोचेमाड ग्रामसेवक पी.ए.गर्कल, तुळस ग्रामसेवक डी.एस.चव्हाण, उभादांडा ग्रामसेवक अरुण जाधव, वेतोरे ग्रामसेवक भूषण चव्हाण, अणसूर ग्रामसेवक बाबल काळसेकर आदी उपस्थित होते. यावेळी जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे, एन.पी.एस.रद्द करा रद्द करा, हमारी युनियन हमारी ताकत, एकच मिशन जुनी पेन्शन, हम सब एक है आदी घोषणा देण्यात आल्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १ नोव्हेंबर २००५ पासून महाराष्ट्र राज्य शासनाने परिभाषित अंशदान पेन्शन योजना राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, ग्रामसेवक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना लागू केली. सन २०१५ पासून या योजनेचे रुपांतर राष्ट्रीय पेन्शन योजनेत करण्यात आलेले आहे. गेल्या सोळा वर्षात एन.पी.एस धारक कर्मचारी, ग्रामसेवक यांचे अनुज्ञेय हक्क नाकारल्याने प्रचंड नुकसान झालेले आहे. महाराष्ट्रात अनेक कर्मचारी, ग्रामसेवक यांचे अकाली निधन झाल्यामुळे आर्थिक नुकसान व पेन्शन नाही. यामुळे त्यांचे कुटुंबीय पूर्ण उध्वस्त झालेले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द होऊन जुनी पेन्शन योजना होणे आवश्यक व कर्मचारी हिताचे आहे. याकरिता महाराष्ट्र विधानसभा यांनी एन.पी.एस.रद्द होण्याचा ठराव कडून केंद्र सरकारकडे पाठवावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पेन्शन योजनेबाबत ग्रामसेवकांनी छेडले आंदोलन
