राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर दाखल गुन्ह्यातील आरोपींची निर्दोष मुक्तता…

कणकवली : कणकवली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या मारहाण व गोंधळाच्या प्रकरणातील सर्व आरोपींची कणकवली येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

नांदगाव तिठा येथे १२ मे २०२३ रोजी रात्री झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सलीम हुसेन बोबडे, अल्लाउद्दीन हुसेन बोबडे, तस्लीम हुसेन बोबडे, यासीर सलीम मास्के, मुनाफ सलीम बोबडे आणि जुबेर सलीम मास्के (सर्व रा. नांदगाव तिठा, ता. कणकवली) यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १४३, १४७, ३२३, ५०४ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतर हे प्रकरण कणकवली येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात सुनावणीस आले. या प्रकरणात सरकारी पक्षामार्फत एकूण सात साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. मात्र आरोपींविरुद्ध ठोस व सबळ पुरावा सिद्ध न झाल्याने तसेच फिर्यादी व आरोपी यांच्यातील वाद हा पूर्वीपासूनच्या राजकीय मतभेदातून निर्माण झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आल्याने न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

या प्रकरणात आरोपींच्या वतीने अॅड. अशपाक शेख यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. पराग नार्वेकर, अॅड. शिवाणी जुवेकर, अॅड. नामदेव मठकर, अॅड. पंकज खरवडे, अॅड. विनय रजपूत, अॅड. कैस शेख आणि अॅड. भूषण कदम यांनी सहकार्य केले.

You cannot copy content of this page