*पुणे-कोकणसाठी ‘अमृत भारत एक्सप्रेस’ची मागणी…

सावंतवाडी टर्मिनसला गती देण्याबाबत रेल्वेमंत्र्यांशी चर्चा..

⚡सावंतवाडी,ता.१३-: पुणे ते कोकण दरम्यान नवीन ‘अमृत भारत एक्सप्रेस’ सुरू करावी तसेच सावंतवाडी टर्मिनस प्रकल्पाचा ‘प्रधानमंत्री गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन’मध्ये समावेश करावा, अशी मागणी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन केली आहे. या भेटीची माहिती डॉ. कुलकर्णी यांनी १३ मार्च २०२६ रोजी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून दिली.

कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीचे पुणे विभाग अध्यक्ष सिद्धेश तळवडेकर यांनी १८ फेब्रुवारी २०२६ रोजी खासदार कुलकर्णी यांना या मागण्यांसंदर्भात सविस्तर निवेदन दिले होते. सध्या पुणे ते कोकण दरम्यान प्रवासासाठी आठवड्यातून दोन वेळा धावणारी पुणे–एर्नाकुलम (२२१४९/५०) हीच गाडी उपलब्ध असून, कोकणात तिचे चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि सावंतवाडी असे मर्यादित थांबे आहेत. त्यामुळे पुणे, कोथरूड, पिंपरी-चिंचवड आणि तळेगाव परिसरातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

ही समस्या दूर करण्यासाठी पुणे ते कोकण दरम्यान दररोज धावणारी ‘अमृत भारत एक्सप्रेस’ सुरू करावी किंवा नांदेड-पुणे-पनवेल एक्सप्रेस (१७६१३/१४)चा सावंतवाडीपर्यंत विस्तार करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

दरम्यान, मुंबई आणि मडगाव येथील टर्मिनल स्थानकांवरील ताण कमी करण्यासाठी सावंतवाडी येथे स्वतंत्र टर्मिनस उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. मात्र प्रशासकीय विलंब आणि निधीअभावी हा प्रकल्प रखडला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा ‘प्रधानमंत्री गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन’मध्ये समावेश करून त्याला गती देण्याची आवश्यकता असल्याचे संघटनेने निदर्शनास आणून दिले.

या योजनेअंतर्गत सावंतवाडी स्थानकाला राष्ट्रीय महामार्ग ६६, गोव्याचे मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ, प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तीपीठ एक्स्प्रेसवे आणि रेडी बंदराशी जोडणारे महत्त्वाचे लॉजिस्टिक केंद्र बनवता येईल. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

या मागण्यांबाबत खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी थेट रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केल्याने पुणे-कोकण रेल्वे प्रवास अधिक सोयीस्कर होण्याची तसेच सावंतवाडी टर्मिनस प्रकल्पाला गती मिळण्याची आशा कोकणवासीयांमध्ये व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page