⚡वैभववाडी ता.१३-: ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचविणे हा जल जीवन मिशन योजनेचा मुख्य उद्देश असून या योजनेमुळे पाणीप्रश्न सुटण्यास मदत होत आहे, असे प्रतिपादन वैभववाडी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी केले. पाण्याचा जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले.
खांबाळे ग्रामपंचायतीच्या वतीने जल जीवन मिशन अंतर्गत जल महोत्सव कालावधीत खांबाळे-टेंबवाडी येथे जल अर्पण दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. जल जीवन मिशन अंतर्गत नवीन नळयोजनेची पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाल्याने नळयोजना हस्तांतरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
टेंबवाडी नळयोजना विहिरीपासून भूतलवाडी येथील पाण्याच्या टाकीपर्यंत वारकरी परंपरेप्रमाणे दिंडी काढून जलसंवर्धनाचा संदेश देण्यात आला. दिंडीत महिलांनी डोक्यावर पाण्याने भरलेल्या कळशी व कलश घेऊन सहभाग नोंदवत पाणी संवर्धनाची जनजागृती केली.
केंद्र शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच शिक्षकांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
यावेळी प्रशासक प्राजक्ता कदम, पाणी पुरवठा विभाग वैभववाडीचे अभियंता श्री. रोहित इंगवले, सागर सुतार, ग्रा.पा.पू. कणकवलीचे श्री. धुरी,मुख्याध्यापिका जयश्री शेट्ये, हनुमंत सुतार, ग्रामपंचायत अधिकारी नयना गुरखे, तंटामुक्त समिती अध्यक्ष लवू पवार, वैभववाडी पंचायत समितीच्या मयुरी शिंगारे, सोनाली रावराणे, सोसायटी माजी चेअरमन दीपक चव्हाण, मंगेश गुरव,सोसायटी संचालक महेश चव्हाण, बळीराम सावंत, राजन साळुंखे, सुरज पवार व सुहास सुतार उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान जलसुरक्षक एकनाथ रामकृष्ण पवार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार ग्रामपंचायत अधिकारी नयना गुरखे यांनी मानले.
जल जीवन मिशन अंतर्गत खांबाळे-टेंबवाडीत जल अर्पण दिवस साजरा…
