उपनगराध्यक्ष आंगचेकर यांची शिष्टाई कामी
*⚡वेंगुर्ला ता.२९-:* पाच महिन्यांनी अखेर वेंगुर्ला शहरातील शाळा नं.२ च्या इमारतीवरील झाड तोडले गेले आणि इमारतीने मोकळा श्वास घेतला. उपनगराध्यक्ष शितल आंगचेकर यांची यशस्वी शिष्टाई कामी आली. शाळा वेंगुर्ला नं.२ च्या इमारतीवर दि.१६ मेच्या तौक्ते चक्रीवादळात वडाचे महाकाय झाड कोसळले होते. ते झाड उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय,वेंगुर्ला यांच्या मालकीचे असल्याने संबंधित प्रशासनाला अर्ज, विनंत्या व निवेदने देऊनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. परंतु, ४ ऑक्टोबर रोजी इयत्ता पाचवी पासूनच्या शाळा सुरु करण्याचे आदेश राज्य शासनाने दिल्यानंतरही वेंगुर्ला नं.२ शाळेच्या पालकांनी झाड तोडेपर्यंत शाळेत मुलांना न पाठविण्याचा निर्णय घेतला होता. तरीही संबंधित प्रशासनाने म्हणावे तसे लक्ष न दिल्याने पालकांनी मुलांचे शैक्षिणक नुकसान होऊ नये म्हणून शाळेच्या व्हरांड्यात वर्ग भरवले. त्यामुळे ही घटना सर्वत्र पसरली. त्याची दखल उपनगराध्यक्ष शितल आंगचेकर यांनी घेऊन त्यांनी वेंगुर्ला शाळा नं.२ चे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष संजय पिळणकर, उपाध्यक्ष अश्वता माडकर, नगरसेवक धर्मराज कांबळी व श्रेया मयेकर आदींसह वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल मुळे यांच्याशी २७ ऑक्टोबर २०२१ रोजी यशस्वी चर्चा करून २८ ऑक्टोबर रोजी सावंतवाडी येथील ठेकेदार बाळा सावंत यांच्या सहकार्यातून ते झाड तोडण्यात आले. त्यामुळे संकटात असलेली शाळा आज त्या वडाच्या झाडातून मुक्त झाली.