*⚡ओरोस ता.२८-:* कोरोना काळात अनेक मुलांच्या डोक्यावरील पालकांचे छत्र हरपले आहे. त्यामुळे कोरोनामुळे तसेच अन्य आजारामुळे ज्या मुलांनी आपल्या पालकांना गमावले आहे, अशा सर्व मुलांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी आज पार पडलेल्या महिला व बाल कल्याण समिती सभेत सांगितले. जिल्हा परिषद महिला व बाल विकास समितीची सभा सभापती शर्वाणी गावकर यांच्या अध्यक्षतेखाली आज छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा महिला व बालकल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष भोसले, समिती सदस्या संपदा देसाई आदीसह अधिकारी सहभागी झाले होते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक बालकांना आपल्या आई-वडिलांना गमवावे लागले आहे. त्यामुळे कोरोनामुळे ज्या मुलांचे आई किंवा वडील यापैकी एक पालक गमावला असेल, अशा मुलांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी सांगितले. तसेच अन्य कोणत्याही आजारामुळे आई किंवा वडील यापैकी एक पालकाचा मृत्यू झाल्यास अशा बालकांनाही या बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात अशी किती मुले आहेत, ज्यांच्या एका पालकाचे निधन झाले आहे. त्याची माहिती पुन्हा एकदा संकलित करण्यात यावी. जेणेकरुन अशा सर्व मुलांना या योजनेचा लाभ मिळवून देता येईल, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी सभेत सांगितले. तसेच कोरोनामुळे अनेक महिलांनी आपले पती गमावले आहेत. अशा स्त्रियांना सध्या जरी काहीही लाभ देता येत नसेल तरीही भविष्यात या महिलांना लाभ देता येऊ शकतो. त्यामुळे अशा महिलांचा पुन्हा सर्व्हे करण्यात यावा. तसेच काही जण जिल्ह्याच्या बाहेर उपचारासाठी गेल्याने तेथे जाऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात मृत्यु पावलेल्या तसेच जिल्ह्यातील नागरिकांचा उपचारादारम्यान जिल्ह्याच्या बाहेर मृत्यू झालेल्या अशा सर्वांचा पुन्हा सर्व्हे करण्यात यावा, असे सोमनाथ रसाळ यांनी सांगितले.
कोरोनात पालक गमावलेल्या मुलांना मिळणार बाल संगोपनचा लाभ
