पालकांची सहमती;वाहतुकीसाठी एसटी बस सुरू करण्याची मागणी
*💫बांदा दि.२२-:* कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीने पालकांनी मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्धार केला होता. परंतु जिल्ह्यातील नववी व दहावीच्या बहुतांश शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान न होण्यासाठी मडुरा हायस्कूलच्या पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यास सहमती दर्शविली. त्यानुसार 1 जानेवारी 2021 पासून शाळा नियमित सुरू करण्याचा निर्णय पालकांनी एकमताने घेतला. न्यू इंग्लिश स्कूल मडुराचे शालेय समिती सदस्य प्रकाश गावडे, मंगल कामत, श्रीकृष्ण भोगले, भीकाजी धुरी, कास सरपंच खेमराज भाईप, मडुरा उपसरपंच विजय वालावलकर, मुख्याध्यापक सदाशिव गवस, शिक्षक एस.सावंत यांच्या उपस्थितीत पालकांनी केलेल्या चर्चेत शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना मास्क व सॅनिटायझर देण्याची जबाबदारी खेमराज भाईप यांनी घेतली. पालकांसोबत झालेल्या चर्चेत दरदिवशी वर्ग सॅनिटायझर करणे, विद्यार्थ्यांचे तापमान तपासणे, तपासणी काही आढळल्यास पालकांना पहिल्यांदा कल्पना देणे, हमीपत्रे घेऊनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश, विद्यार्थ्याचे आधार कार्ड व पालकाचा मोबाईल नंबर आणणे, महाकरिअर पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणे, एसटी वाहतूक बंद असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी एसटीची मागणी करणारे निवेदन सावंतवाडी आगारला देणे, शाळा नेहमी सुरू ठेवणे अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील शाळांत नववी व दहावी असे एकदिवस आड करून वर्ग सुरू आहेत. परंतु मडुरा हायस्कूल एक अपवाद आहे की एकाचवेळी दोन्ही वर्ग सुरू राहणार आहेत. शिक्षकांची कमतरता असताना सुद्धा कोरोनासंदर्भात सर्व नियमांचे पालन करून आम्ही विद्यार्थ्यांना शिक्षण देणार असल्याचे मुख्याध्यापक सदाशिव गवस यांनी सांगितले.
