पेडणेत एक्साईजच्या भरारी पथकावर हल्ला

*⚡बांदा ता.२०-:* गोव्यातील पेडणे तालुक्यात सरंबळ येथे मंगळवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास खासगी वाहनातून कारवाई करण्यास गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई भरारी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर स्थानिकांकडून चोर-लुटेरे समजून प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये दोघे कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत पेडणे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्हा उत्पादन शुल्क खात्याचे वरिष्ठ अधिकारी गोव्यात दाखल झाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबई येथील भरारी पथक गोवा हद्दीत कारवाई करण्यासाठी गेले होते. रात्री उशिराची वेळ असल्याने पथक खासगी वाहनातून गेले होते. या घटनेत उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थ यांच्यात बाचाबाची झाली. त्याचे पर्यवसान पुढे हाणामारीत झाल्याने दोन कर्मचारी गंभीर जखमी झालेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मुंबई येथील भरारी पथक मंगळवारी रात्री कारवाई करण्यासाठी पेडणे तालुक्यात दाखल झाले, मात्र त्यांच्यासोबत खासगी वाहन असल्याने व चौकशी करत असल्याने स्थानिकांना चोर किंवा लुटेरे असल्याचा संशय आला. ग्रामस्थांनी पथकातील कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र मागितले. मात्र कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र न दाखविल्याने जोरदार बाचाबाची झाली. ग्रामस्थांनी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांचा काळोखात चोप काढला. तसेच पथकासोबत असलेल्या खासगी मोटारीची काच देखील फोडण्यात आली. या झटापटीत दोन कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत झाली. यातील एका गंभीर कर्मचाऱ्यावर गोवा-बांबोळी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दुसऱ्या गंभीर जखमी झालेल्या कर्मचाऱ्याला अधिक उपचारासाठी पुणे येथे पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत पेडणे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

You cannot copy content of this page