महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने निवेदन सादर
*⚡कणकवली ता.२०-:* कणकवली तालुक्यातील शाळा व कॉलेज व्यवस्थापन यांच्याशी समन्वय साधून योग्य ती कार्यवाही करावी तालुक्यातील ग्रामीण भागात जाणाऱ्या व येणाऱ्या गाड्यांच्या वेळा या पूर्ण कालावधीपूर्वी जशा नियमित होत्या त्याचप्रमाणे करण्यात याव्यात अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने कणकवली आगार प्रमुख यांच्याकडे निवेदन देत करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कणकवली तालुकाध्यक्ष सुरज नाईक यांच्या नेतृत्वाखाली विराज सरंगले, विजय चव्हाण ,स्वप्निल शिरसाट यांनी हे निवेदन सादर केले. कोरोना वैश्विक महामारी मुळे सन २०२१-२०२२ शैक्षणिक वर्ष उशिराने चालू होत आहे. २ सप्टेंबर पासून इयत्ता १०वी/१२वी आणि ४ ऑक्टोंबरपासून ५वी/९वी/११वीचे वर्ग शासनाच्या आदेशाप्रमाणे नियमितपणे सुरू केलेले आहेत. त्याच प्रमाणे उच्च शिक्षण वर्ग सुद्धा २० ऑक्टोंबर पासून सुरु होत आहेत. एक-दीड वर्षापासून टाळेबंदीमुळे बंद असलेली एसटी बस सेवा सुद्धा आता पूर्ण क्षमतेने सुरू झालेली आहे परंतु टाळेबंदीनंतर सुरु होणारी शाळा कॉलेजेस हे कोरोनाचे नियम पाळून सुरू झाले असल्यामुळे शाळा-कॉलेजेस यांच्या वेळा या प्रत्येक वर्गवारीनुसार वेगवेगळ्या असल्याने आपल्या आगारातून सुटणाऱ्या बसच्या फेऱ्या यांच्या वेळा व शाळा कॉलेज यांच्या वेळा मध्ये काही ठिकाणी ताळमेळ बसत नसल्याने विद्यार्थी यांचे अतोनात हाल होत आहेत. तरी या मागणीचा विचार करावा अशी मागणी करण्यात आली.
