कवयित्री सौ. प्रमिता तांबे यांचे प्रतिपादन…
*⚡मालवण ता.१६-:* आजचे युग हे स्पर्धेचे असल्याने विध्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर सतत अवांतर वाचन केले पाहिजे. जीवनात जर यशस्वी व्हायचे असेल तर प्रयत्न, वाचन आणि आत्मनिर्धार म्हणजेच स्वयंनिर्धार या गुणांची आवश्यकता असते आणि ही त्रिसूत्रीच प्रत्येकाला सर्वोच्च यशापर्यंत पोहोचवते असे प्रतिपादन कणकवली येथील कवयित्री सौ. प्रमिता तांबे यांनी येथे बोलताना केले. मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूलमध्ये भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सौ. प्रमिता तांबे , कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लोकल कमिटीचे खजिनदार जॉन नरोना, मुख्याध्यापक व्ही. जी. खोत, पर्यवेक्षक एच. बी. तिवले, प्रफुल्ल देसाई आदी व इतर उपस्थित होते. प्रारंभी प्रफुल्ल देसाई यांनी प्रास्ताविक करीत उपस्थितांचे स्वागत केले तर आर. डी. बनसोडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी बोलताना सौ. प्रमिता तांबे म्हणाल्या, कोणतेही अलौकिक कार्य करण्यासाठी वाचन असणे गरजेचे आहे. एखाद्या पुस्तकामधून काहीतरी बोध घेतला पाहिजे प्रेरणा घेतली पाहिजे. पुस्तकामुळे एखाद्याचे आयुष्य घडू शकते तो चांगल्या मार्गी लागू शकतो. पुस्तक वाचले तर त्यातील ज्ञान कधीच वाया जात नाही. वाचन केल्यामुळेच आपल्यात आत्मविश्वास येऊ शकतो आणि म्हणून वाचन करणे खूप महत्त्वाचे आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला रहायला नव्हे तर केवळ पुस्तकांसाठी घर खरेदी केले होते. फासावर जाण्यापूर्वी भगतसिंग यांनी पुस्तक वाचनासाठी अन्न त्याग केला होता. आपले व्यक्तिमत्त्व घडवायचे असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाही. जो वाचतो तोच आत्मविश्वासाने समाजासमोर वावरू शकतो. म्हणून विद्यार्थ्यांनी सतत वाचन केले पाहिजे . विद्यार्थ्यांनी आपल्या मनामध्ये आय ऍम ए बेस्ट चा जागर केला तर विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकास होण्यास वेळ लागणार नाही असेही त्या म्हणाल्या. यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. जॉन नरोना यांनी वाचनाने माणूस समृद्ध बनतो, प्रगल्भ बनतो त्यामुळे प्रत्येकाने सतत काहीना काही वाचत राहिले पाहिजे असे सांगितले तर मुख्याध्यापक व्ही. जी. खोत यांनी वाचनाचे महत्त्व विशद केले.यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. शेवटी आर. बी. देसाई यांनी आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. संजना सारंग यांनी केले.