स्वच्छता सर्वेक्षण २०२१ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर कायम

ओरोस ता १६ -: देशातील ग्रामीण भागासाठी सुरू असलेल्या स्वच्छता सर्व्हेक्षण २०२१ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आगे कूच करीत असलातरी राज्यात तिसऱ्या नंबर वर असलेल्या सातारा जिल्ह्याने पहिले स्थान गाठले आहे. पहिल्या क्रमांकावर असलेला अहमदनगर जिल्हा तिसऱ्या स्थानी गेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याने दुसरे स्थान कायम टिकविले असलेतरी पहिल्या स्थानी असलेल्या सातारा जिल्ह्याच्या तुलनेत ४ हजार ५८२ अभिप्राय कमी आहेत. अभिप्राय नोंदविण्यासाठी २० ऑक्टोबर ही शेवटची डेडलाईन आहे. उर्वरित कालावधीत जास्तीत जास्त नागरिकांनी अभिप्राय नोंदवून जिल्हा राज्यात एक नंबर ठेवावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी एकदा नागरिकांना केले आहे. स्वच्छता प्रिय असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने केंद्र शासनाच्या हागणदारी मुक्त अभियानात जिल्ह्याने सर्वाधिक काम केले होते. त्यामुळे आशिया खंडात पहिला हागणदारी मुक्त होण्याचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला आहे. तसेच स्वच्छ जिल्हा स्पर्धेत भारत देशात पहिला क्रमांक या जिल्ह्याने मिळविला आहे. राज्य शासनाच्या ग्राम स्वच्छता अभियानात जिल्ह्यातील अनेक गावांनी राज्यात व कोकण विभागात सातत्याने यश मिळविले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांच्या नसानसात स्वच्छता भिनलेली आहे. त्याचे प्रतिबिंब अभिप्राय नोंदणीमध्ये उमटणे गरजेचे आहे, असे अध्यक्षा सौ सावंत यांनी सांगितले. ओडीएफ प्लस म्हणजेच हागणदारी मुक्त अधिक या अभियान अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या स्वरूपाचे काम सुरू आहे. शौचालय उभारणी व वापर, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन यासाठी गुण आहेत. याचे काम जिल्ह्यात चांगले आहे. त्याचे मूल्यमापन करण्यासाठी केंद्रीय समिती जिल्ह्यात येणार आहे. यासाठी असलेले गुण सर्वाधिक आपल्याला मिळणार आहेत. परंतु यापूर्वी त्रयस्थ संस्थेकडून तपासणी करून गुण दिले जायचे. ती पद्धत आता बंद करून जिल्ह्यातील नागरिकांच्या अभिप्राय प्रतिसादावर हे गुण ठेवण्यात आले आहेत. ३५० गुण एकूण अभिप्रायासाठी आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्या अन्य जिल्ह्याच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे अभिप्राय नोंदणी प्रतिसाद कमी मिळतो. परंतु ३५० गुण मिळण्यासाठी जास्तीतजास्त अभिप्राय आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या. हे ३५० गुण जिल्ह्याला मिळाले तरच आपला जिल्हा आघाडीवर राहणार आहे. त्यामुळे याबाबत आवाहन करण्यासाठी ८ ऑक्टोबर पासून तालुक्या तालुक्यात बैठका घेण्यास सुरू करण्यात आली आहे. चळवळ पद्धतीने जनजागृती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामिण अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2021 मध्ये नागरीकाचा सहभाग नोंदविण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर SSG21 हे ॲप सुरु करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातुन गावातील सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता सुविधा यावरील प्रश्नाची उत्तरे ग्रामस्थांना द्यावयाची आहेत, असे आवाहन अध्यक्षा संजना सावंत यांनी केले आहे.

एक नंबर मिळवण्यासाठी नागरिकांनी अभिप्राय नोंदवावेत; जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत

You cannot copy content of this page