विद्यामंदिरचे पर्यवेक्षक पी.जे.कांबळे यांनी केले आवाहन
*⚡कणकवली ता.१६-:* आजच्या आधुनिक युगात वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. वाचन संस्कृती टिकवायची असेल तर युवापिढीला वाचनाची सवय लावण्यासाठी वाचनप्रेमींनी पुढाकार घेतला पाहिजे. तसेच तरुणाईने देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम व संसदपटू बॅ. नाथ पै या थोर तत्त्वज्ञानी व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे, असे आवाहन विद्यामंदिरचे पर्यवेक्षक पी.जे.कांबळे यांनी केले. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दूल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून नगर वाचनालयातर्फे गुरुवारी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन श्री. कांबळे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राहुल मराठे, नगर वाचनालयाचे कार्यवाह महंमद हनीफ आदम परिखान, वाचनालयाचे माजी अध्यक्ष तथा सदस्य डी.पी.तानवडे व नगर वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते. डॉ. कलाम हे थोर तत्वज्ञानी व्यक्ती होते. त्यांनी सकारत्मक दृष्टीने जगण्याचा संदेश दिला. त्यांनी विज्ञान युगात खूप मोठे काम उभे केले. यामुळेच त्यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. सर्वानीच वाचनाची सवय विकसित करून आपले व्यक्तिमत्त्व समृद्ध करणे ही डॉ. कलाम यांना खरी आदरांजली ठरेल, असे कांबळे यांनी सांगितले. डी.पी.तानवडे म्हणाले, या जगात मोठे व्हायचे असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाही. आपले विचार व जीवनात प्रगल्भता आणण्यासाठी वाचन हे महत्त्वाचे आहे. मिळेलती पुस्तके, वर्तमान पत्रांचे वाचन करण्याची आवड ही शैक्षणिक जीवनापासून झाल्यास विद्यार्थ्यांना त्यांचा फायदा होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांनी आपली मनोगत व्यक करताना व्यक्तीच्या जीवनात वाचनाचे महत्त्व काय आहे, हे समजून सांगितले. यावेळी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम ग्रंथसंपदा व ग्रंथालयातील विविध विषयांवर नवीन खरेदी केलेल्या ग्रंथांची मांडणी करण्यात आली होती.