Headlines

समाजातील महिलांना स्वतःच्या पायावर उभ्या करणारी स्त्री शक्ती

मंदाकिनी सामंत यांनी सिद्ध केले महिलाही उद्योजक होऊ शकतात नर्मदा कॅश्यू इंडस्ट्रीजच्या माध्यमातून दिलाय आदर्श

*⚡सावंतवाडी ता.१४ सदैव राऊळ-:* महिलांनी महिलांसाठी व्यवसाय सुरू करून त्यांना स्वत: च्या पायावर उभे राहण्यासाठी महत्त्वाची कामगिरी वेंगुर्ले येथील नर्मदा केश्यू इंडस्ट्रीजच्या संचालिका मंदाकिनी दिलीप सामंत यांनी केली आहे. लघु उद्योगांची उभारणी करून तो कोकणातील महिला यशस्वी करू शकतात हे मंदाकिनी सामंत यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. पूर्वाश्रमीच्या हुबळी येथील मंदाकिनी जयवंत पै यांचा १९८१ साली वेंगुर्ले येथील दिलीप सामंत यांच्याशी विवाह झाला. प्रथम संसाराला हातभार लावण्यासाठी नोकरी करण्याचा विचार त्यांनी केला होता पण मुळात नोकऱ्या कमी तसेच घर सांभाळून बाहेर जाणे शक्य नसल्याने घरीच काहीतरी व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय त्यांनी व त्यांच्या सासूबाईंनी घेतला. कोकणात काजू विपुल प्रमाणात असल्याने काजूवर प्रक्रिया करण्याचे निश्चित करून १० ते १५ हजार रुपये भांडवल गुंतवून काजू उद्योगास सुरुवात केली. आज त्यांच्या या व्यवसायाला ३७ ते ३८ वष्रे असून त्यांनी उद्योगरूपी लावलेल्या रोपाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. हा व्यवसाय सुरू करतेवेळी मंदाकिनी सामंत यांनो बँक ऑफ इंडियातून कर्ज घेतले तसेच काही शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी उधारीवर कच्चा माल देऊन त्यांना साहाय्य केले. आजही कारखान्यात वर्षभर लागणारी काजू बी ६० टक्के स्थानिक शेतकरऱ्यांकडून तर ४० टक्के व्यापाऱ्यांकडून घेतली जाते. मंदाकिनी सामंत यांनी सुरू केलेल्या काजू कारखान्यामुळे १५० ते १६० महिलांना तसेच काही पुरुषांना रोजगार मिळाला आहे. उत्पादनाचे स्वरूप लक्षात घेता २५ ते ३० वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या कल्पनेने काजूगर विक्रीसाठी काजू विक्रीची दुकाने सुरू केली. आज वेंगुर्ले, सावंतवाडी, मालवण येथील नर्मदा केश्यूची काजूगर विक्रीची दुकानेही त्यांनी उभारली आहेत. मंदाकिनी सामंत यांचा व्यवसायाबरोबरच सामाजिक कार्यातही मोठा सहभाग आहे. लायन्स क्लबचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवीत सामाजिक कार्याचा वसा कायम ठेवला आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेतल्याने त्यांना लायन्स क्लबचे सदस्यत्व आजही अखंडितपणे मिळाले आहे. कारखान्यात काम करणाऱ्या मुलींच्या लग्नासाठी, आजारी व्यक्तींच्या आर्थिक मदतीसाठी तसेच गोरगरीब मुलांना शालेय साहित्याच्या मदतीसाठी त्यांचा हातभार कायम असतो. ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ अभियानांतर्गत आपल्या घरामागील ओहोळावर स्वतः बंधारा घालून शासनाच्या उपक्रमात त्यांनी आधी केले आणि मग सांगितले, अशा प्रकारचा सक्रिय सहभाग नोंदविला. पावस येथे स्वामी स्वरुपानंदांच्या जन्मोत्सवासाठी विठ्ठल रखुमाईची पालखी देऊन आध्यात्मिक क्षेत्रातही त्यांनी ठसा उमटविला . मंदाकिनी सामंत यांचे कार्य आज कोकणक्षेत्रात नावलौकिक मिळवून आहे, ते त्यांच्या कर्तृत्ववामुळेच. त्यांच्या उद्योगाला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स महिला उद्योजिका पुरस्कार (२००२) कॉम्रेड श्रीकांत लाड स्मारक समिती पुरस्कार मुंबई (२००२), बाबुराव धनवटे पुरस्कार (२००२), रत्नसिंधू गौरव पुरस्कार (२००३), भाऊसाहेब वर्तक उद्योजिका पुरस्कार वसई (२००७) असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. दरम्यान कोकणात अनेक ठिकाणी उद्योग साकारले आहेत ते केवळ पुरुष उद्योजकांचेच, पण मंदाकिनी सामंत यांनी आपल्या कर्तबगारीने राज्यात महिला उद्योजकांमध्ये मानाचे स्थान निर्माण केले आहे. व्यावसायिक क्षेत्रातील उल्लेखनीय यशाबद्दल मंदाकिनी सामान म्हणतात की, घरच्यांचा पाठिंबा आणि कर्मचाऱ्यांची जीवापाड मेहनत हीच आपल्या उद्योगाच्या भरारीची खरी ताकद आहे. आपल्याला मिळालेले पुरस्कार आणि विविध सामाजिक संस्थांनी केलेल्या गौरव हा केवळ आपल्या उद्योगाचा नाहीतर यासाठी झटणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा आणि मार्गदर्शकांचा सन्मान आहे. आपल्या उद्योग निर्मितीचा ध्यास महिलांना रोजगार देणे हा आहे. कारण रोजगार करणाऱ्या महिलांनाच आदरपूर्वक स्थान दिले जाते. त्यामुळे स्थानिक महिलांच्या सहकार्याने नर्मदा कॅश्यू इंडस्ट्रीजचे नाव राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उच्चस्तरावर पोहोचवून कोकणातील महिलांची उद्योगातील क्षमता व कर्तबगारी दाखवून देण्याचे ध्येय उराशी बाळगले आहे. अशा कर्तव्यदक्ष कार्यतत्पर नवदुर्गेस ग्लोबल महाराष्ट्र न्युज चॅनेलचा प्रमाम व त्यांना पुढील वातचलीस शुभेच्छा

You cannot copy content of this page