अवैध वाळू उत्खनन प्रकरणी तिन्ही संशयित आरोपींना १५ ऑक्टोंबर पर्यंत पोलिस कोठडी

मालवण (प्रतिनिधी) काही दिवसांपूर्वी देवबाग येथे कर्ली खाडी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या बोटींवर करण्यात आलेल्या कारवाईमधील गुन्हा दाखल झालेले संशयित बोट मालक सागर रामचंद्र परब (वय २८, रा. बाव कुडाळ), लीलाधर जगदीश खोत (वय ३६, रा. चिपी वेंगुर्ले) व मुकेश नामदेव सारंग (वय ३६, रा. चिपी वेंगुर्ले) या तिघांचा जिल्हा न्यायालयाने जामीन नाकारल्याने काल मंगळवारी हे तिघेही मालवण पोलीस स्थानकात हजर झाल्यानंतर . पोलिसांनी त्यांना अटक केली दरम्यान, आज या संशयित तिघांनाही पोलिसांनी मालवण न्यायलयात हजर केले असता त्यांना १५ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. देवबाग येथे कर्ली खाडी पात्रात २ ऑक्टोबर रोजी अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या बोटी देवबाग ग्रामस्थानी पकडल्या होत्या. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थानी पकडलेल्या बोटी व साहित्य जप्त करत कामगारांना पोलिसांच्या हवाली केले होते. याबाबत अनधिकृत वाळू उपसा व शासकीय मालमत्तेची चोरी प्रकरणी मालवण पोलीस स्थानकात बोट मालक सागर रामचंद्र परब, मुकेश नामदेव सारंग, लीलाधर जगदीश खोत या तिघांसह ४८ कामगार अशा एकूण ५१ जणांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील अटक केलेल्या ४८ कामगारांची वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली. तर गुन्हा दाखल केलेल्या तिन्ही बोट मालकांचा शोध पोलिसांकडून सुरू होता. या तिन्ही बोट मालकांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायलयात अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने तो अर्ज फेटाळला होता. मात्र काल मंगळवारी हे तिघेही बोट मालक स्वतःहून मालवण पोलीस स्थानकात हजर झाल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली. आज बुधवारी तिघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांना १५ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक सोनू ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण हे अधिक तपास करत आहेत.

You cannot copy content of this page