जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची गुगल फॉर्मद्वारे माहिती गोळा करण्याची मोहीम

*⚡मालवण ता.१३-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापार क्षेत्राची अद्ययावत सांख्यिकी मिळविण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने गुगल फॅार्मच्या माध्यमातून जिल्ह्यातील तमाम व्यापारी बांधवांची माहिती गोळा करण्याची मोहिम जिल्हा व्यापारी महासंघातर्फे हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाला जिल्ह्यातील व्यापार विश्वाच्या विविध समस्या अडचणी शासन दरबारी धसास लावतांना जिल्ह्यातील व्यापार जगताची अधिकृत सांख्यिक उपलब्ध नसल्याने अनेक मर्यादा पडतात. विशेषत: कोविड काळात विज देयक किंवा व्याज सवलती बाबत शासन दरबारी संवाद साधताना अशी निश्चित व विश्वासार्ह माहिती कुठेही उपलब्ध नसल्याने या बाबत ठोस आश्वासन सरकार कडून मिळवण्यात महासंघाला अद्याप यश मिळू शकले नाही. ही बाब ध्यानात आल्या मुळे महासंघातर्फे जिल्ह्यातील व्यापार क्षेत्राची अद्ययावत सांख्यिकी मिळविण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने गुगल फॅार्म च्या माध्यमातून जिल्ह्यातील व्यापारी बांधवांची माहिती गोळा करण्यात येणार आहे, असे जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर यांनी म्हटले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापार क्षेत्राची खात्रीशीर माहिती उपलब्ध होण्यासाठी महासंघाने तयार केलेल्या या गुगल फॅार्म ची कळ(लिंक) https://forms.gle/K4SYRFW6SyhBiK7y7 अशी आहे. सर्व प्रकारचे दुकानदार, व्यावसायीक,पर्यटनाच्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेले पर्यटन व्यावसायीक, फिरते विक्रेते, मासे, भाजी, फळ विक्रेते, रिक्षा व्यावसायीक, गाड्या स्कूटर भाड्याने देणारे थोडक्यात नोकरी व्यतिरिक्त अन्य मार्गानी उत्पन्न मिळविणाऱ्या अशा सर्वानीच हा अर्ज दाखल करून महासंघास सहकार्य करावे, जेणे करून शासनस्तरावर जिल्ह्यातील व्यापारी बांधवांच्या कोणत्याही बाबीं बाबत बाजू मांडताना किंवा सवलतींबाबत मागण्या करतांना उपलब्ध ठोस माहितीच्या आधार मिळेल. याविषयी कोणतीही शंका किंवा माहिती हवी असल्यास महासंघांचे पदाधिकारी किंवा स्थानिक व्यापारी संघाचे अध्यक्षांशी संपर्क साधावा किंवा महासंघांचे कार्यवाह नितीन वाळके यांच्या ९४२२०५४५८८ या क्रमांकावर मिसकॅाल द्यावा, असे आवाहन महासंघांचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page