डाकघर अधीक्षक आ ब कोड्डा यांची माहिती;राष्ट्रीय डाक अदालत सप्ताह निमित्त करण्यात आले होते आयोजन
ओरोस-:भारतीय डाक विभागामार्फत 9 ते 16 ऑक्टोबर 2021 कालावधीत राष्ट्रीय डाक सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहा अंतर्गत 12 ऑक्टोबर रोजी डाक जीवन वीमा दिवस साजरा करण्यात आला. या दिवशी सिंधुदुर्ग डाक विभागातर्फे डाक जीवन वीमा आणि ग्रामीण डाक जीवन विम्याचा जास्तीत जास्त प्रचार करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मेळावे आयोजित करून स्थानिक ग्रामस्थ आणि नागरिकांना या योजनेबाबत माहिती देण्यात आली. यावेळी जीवन विम्याचे तब्बल ४६६ पॉलिसी उघडल्या. सिंधुदुर्ग डाक विभागाची ही कामगिरी महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकाची ठरली आहे. या दिवसाच्या अनुषंगाने नवीन प्रीमियम जमा करण्याच्या या विशेष मोहिमेत सिंधुदुर्ग विभागाने डाक सप्ताहात अतिशय उज्वल कामगिरी करत 466 नवीन पॉलीसीचे प्रस्ताव घेत 18 लाख 07 हजार 51 रुपये इतका नवीन प्रीमियम जमा करत संपूर्ण महाराष्ट्र सर्कलमध्ये चौथा क्रमांक पटकावला. या पूर्वी अशाच ग्रामीण डाक जीवन वीमा पॉलीसी उघडण्याच्या मोहिमेत सिंधुदुर्ग डाक विभागाने जुलै 2021 मध्ये संपूर्ण महाराष्ट्र सर्कलमध्ये पहिला तर माहे सप्टेंबर 2021 मध्ये दुसरा क्रमांक मिळविला होता. भौगोलिक दृष्ट्या अतिशय लहान आणि प्रामुख्याने ग्रामीण भाग असून ही सिंधदुर्ग विभागाने केलेल्या या कामगिरीबाबत डाक अधीक्षक सिंधुदुर्ग यांनी जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक करून या यशासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच या दिवसाच्या अनुषंगाने ज्या डाक जीवन वीमा धारकांच्या वीमा पॉलीसीची मुदत पूर्ण झाली आहे त्यांना डाकघर अधीक्षक आ.ब. कोड्डा यांचे हस्ते त्यांच्या पॉलीसीच्या परिपक्वता राशीचे चेक प्रदान करण्यात आले. डाक विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या जीवन वीमा योजनेचा जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र जनतेने जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी आ.ब. कोड्डा यांनी केले.
