वायरी-तारकर्ली-देवबाग रस्त्याला झळकत आहेत रस्त्यावर भाष्य करणारे बॅनर
मालवण: (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे जनतेत नाराजीचे वातावरण असतानाच काही दिवसांपूर्वी कांदळगाव तसेच वायरी तारकर्ली देवबाग रस्त्यावर खड्ड्यांच्या प्रश्नाबाबत बॅनरबाजी झाली होती. मात्र वायरी तारकर्ली मार्गावरील बॅनर काही जणांकडून फाडण्यात आल्याने वायरी, तारकर्ली, देवबागमार्गासह देवली येथे पुन्हा एकदा बॅनर झळकले असून खड्ड्यांचा प्रश्न आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कामगिरीवर बॅनरवरील मजकुरातून मार्मिक फटकारे देण्यात आले आहेत. “एक फाडलात तर १० लावणार पण मालवण तारकर्ली रस्त्यावरचं खड्ड्यांचं वैभव दाखवतच राहणार” असा सूचक इशारा या बॅनरच्या माध्यमातून देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी कांदळगावच्या रस्त्यावर बॅनर लावण्यात आला होता. या बॅनर मधून रस्त्याची दुरवस्था समोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. या बॅनरची जोरदार चर्चा जिल्ह्यात झाली. त्यानंतर तारकर्लीच्या रस्त्यावर देखील असाच एक बॅनर लावून खड्डेमय परिस्थितीकडे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र हा बॅनर कोणीतरी फाडून टाकला होता. या घटनेनंतर आज तारकर्ली, देवबाग, वायरी, देवलीच्या रस्त्यावर पुन्हा एकदा बॅनर दिसून आले आहेत. तारकर्ली एक पर्यटन गाव की तारकर्ली एक खड्डडेमय गाव ?, “बॅनर फाडा की जाळा पण खड्ड्यातून जाताना तोंड काळं करा”, ” एक फाडलात तर १० लावणार पण मालवण तारकर्ली रस्त्यावरचं खड्ड्यांचं वैभव दाखवतच राहणार’, “७८ कोटींचो आकडो पेपरातच गाजलो रस्त्यावरून जाताना खड्डोच पुढ्यात गावलो”, “समर्थक कडवे असावेत पण हजारवेळा खड्ड्यात पडले तरी आपल्या साहेबांना समर्थन देणारे xxx नसावेत” अशा आशयाचा मजकूर सर्वत्र लावण्यात आला आहे. हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. बॅनरमुळे रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असून रस्त्यांची कामे सुरू होणार कधी असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.
