आनंद देणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी करत स्वतःचे मानसिक आरोग्य जपावे – सोनाली ओगले

*⚡मालवण ता.११-:* सध्याच्या युगात मानसिक आरोग्य चांगले ठेवणे महत्वाचे बनले आहे. शालेय मुलांचेही मानसिक आरोग्य उत्तम ठेवणे गरजेचे आहे. शालेय मुलांनी स्वतःमधील चांगले गुण ओळखून ते जोपासले पाहिजे. आनंद देणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी करत स्वतःचे मानसिक आरोग्य जपावे असे प्रतिपादन समुपदेशक सोनाली ओगले यांनी मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल मध्ये बोलताना केले. जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण संचलित कौटुंबिक सल्ला केंद्रातर्फे भंडारी ए. सो. हायस्कुल मध्ये मानसिक आरोग्य विषयक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी समुपदेशक सोनाली ओगले या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर सेवांगणचे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, मुख्याध्यापक व्ही. जी. खोत, आहार तज्ञ डॉ. गार्गी ओरसकर, प्रकाश कुशे, कोलगाव निरामयच्या सामाजिक कार्यकर्त्या वंदना करंबळेकर, मनोजकुमार गिरकर आदी उपस्थित होते. यावेळी सोनाली ओगले म्हणाल्या, शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक आरोग्यावर प्रत्येक व्यक्तीच्या मनाचे आरोग्य अवलंबून असते. आपण जसे आहोत तसे स्वतःला स्विकारता आले पाहिजे. मनातील भावनांचा प्रवाह हा मध्यम ठेवून भावनांवर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे. तसेच दुसऱ्यांच्या भावनांची जाणीव आपल्याला असली पाहिजे. या सर्व गोष्टी आपण उत्तम रित्या जोपासू तेव्हाच आपण मानसिक दृष्ट्या परिपक्व होऊ शकतो. मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी रोज व्यायाम, सकस आहार व पुरेशी झोप आवश्यक आहे असेही त्या म्हणाल्या. यावेळी वंदना करंबळेकर यांनी मागर्दशन करताना मुलांनी आपल्यातील कौशल्यावर मेहनत घेऊन ते विकसित करावे, असे सांगितले. मुख्याध्यापक व्ही. जी. खोत यांनी जे काम कराल त्यात स्वतःला झोकून देऊन काम करा असे सांगितले. तर डॉ. गार्गी ओरसकर यांनी मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी आहाराचे असलेले महत्व विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अदिती कुडाळकर हिने केले. या कार्यक्रमास भंडारी हायस्कुलमधील विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षक उपस्थित होते.

You cannot copy content of this page