रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे लोकांना होणाऱ्या त्रासाबद्दल आवाज उठविण्यासाठी करण्यात आले आंदोलन.
*⚡कुडाळ ता.२९-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावर खड्डे की खड्ड्यामधील रस्ते अशी स्थिती बऱ्याच ठिकाणी आहे. या खड्डेमय रस्त्यावरून जनता जीव मुठीत धरून प्रवास करत आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवास करताना लोकांना होणाऱ्या त्रासाबद्दल आवाज उठविण्यासाठी आज शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने कुडाळ-वेंगुर्ला रस्त्यावरील पिंगुळी रेल्वे ब्रिज येथे भीक मागा आंदोलन करण्यात आले. या अगोदर पिंगुळी काळेपाणी येथे रस्त्यावर पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये झाडे लावून खड्डे बुजविण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सर्वश्री राज वारंग, प्रकाश बरगडे, प्रथमेश धुरी, सुशांत नाईक, दैवेश रेडकर, रमाकांत नाईक आदी शिवप्रेमी उपस्थित होते. रस्त्यासाठी निधी मंजूर झाला याचे स्वागत, परंतु तो पर्यंत जनतेने खड्ड्यांमधून प्रवास करावा का ? असा सवाल शिवप्रेमी सिंधुदुर्गच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील काही रस्त्यांसाठी निधी मंजूर झाला आहे, हे स्वागतार्ह आहे. परंतु शासकीय कामे किती संथ गतीने चालतात, हे सर्वांना माहीत आहे. मग तोपर्यंत जनतेने खड्ड्यांमधूनच प्रवास करावा का? रस्त्याचे काम होण्यासआधी जर खड्ड्यांमध्ये अपघात होऊन, जर कुणाचा मृत्यू झाला, तर त्याला जबाबदार कोण? त्यामुळे काम होईल तेव्हा होईल, पण जे भले मोठे खड्डे पडलेले आहेत, ते किमान भरून लोकांना होणारा त्रास कमी करावा, अशी मागणी शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने करण्यात आली. खड्डे बुजवायचा विषय आला की सार्वजनिक बांधकाम विभाग निधी नसल्याचे कारण देतो. त्यामुळे आजच्या भीक मागा आंदोलनाच्या माध्यमातून जनतेकडून खड्डे भरण्यासाठी निधी गोळा करण्यात आला. जमलेला निधी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आला व तातडीने खड्डे बुजविण्याची मागणी करण्यात आली.
