तहसीलदार अजय पाटणे
*⚡मालवण ता.२७-:* मालवण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी समाजाच्या सर्व घटकांनी एकत्र येऊन संघटित प्रयत्न केले पाहिजेत. पर्यटकांना चांगल्या सुविधा दिल्यास त्याचा पर्यटन वाढण्यास मदत होईल. अतिथी देवो भव ही भावना आपण सर्व घटकांनी जोपासली पाहिजे, असे प्रतिपादन तहसीलदार श्री. अजय पाटणे यांनी मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील पर्यटन सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी केले. पर्यटन दिनाच्या निमित्ताने मालवण येथील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या आयक्यूएसी कक्षाच्या वतीने २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधी मध्ये पर्यटन सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताहाचे उद्घाटन तहसीलदार अजय पाटणे यांच्या हस्ते करण्यात आले. आय. क्यू. ए. सी. कक्षाचे समन्वयक प्रा. बी. एच. चौगुले यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी कार्याध्यक्ष श्री. बाळासाहेब पंत वालावलकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देवून तहसीलदार श्री. अजय पाटणे यांचा सत्कार करण्यात आला. पर्यटनाशी संबंधित सर्व घटकांना एका व्यासपीठावर आणून,पर्यटन विषयक धोरणाची चर्चा व्हावी, शाश्वत आणि जबाबदार पर्यटनाची कास धरावी, अधिकाधिक विद्यार्थांना पर्यटन व्यवसायास आवश्यक कौशल्ये प्राप्त व्हावीत आणि त्यांना रोजगाराच्या संधी प्राप्त व्हाव्यात, हे पर्यटन सप्ताहाचे उद्देश प्राचार्या डॉ. उज्ज्वला सामंत यांनी आपल्या प्रास्ताविकात स्पष्ट केले. यावेळी बोलताना कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. बाळासाहेब पंत वालावलकर यांनी अध्यक्षीय भाषणात मालवण शहरात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन जिल्हा जाहीर झाल्यापासून झालेले विविध बदल नमूद करत, शासनाने पर्यटन व्यवसायास अधिक पाठबळ देण्याची गरज आहे, असे मत मांडले. या पर्यटन सप्ताहात महाविद्यालयाच्या विविध विभागांच्या वतीने अभिनव कार्यक्रमाचे आयोजन केले असून प्रा. शंकर खोबरे, डॉ. एम. आर.खोत ग्रंथपाल प्रा. संग्रामसिंह पवार, प्रा. कैलास राबते, डॉ. सुमेधा नाईक यांनी यावेळी उपक्रमांची माहिती दिली. या सर्व उपक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी डॉ. आर. एन. काटकर यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेचे सदस्य संदेश कोयंडे, शैलेश सामंत, माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव अमेय देसाई व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच लायन्स क्लब मालवणचे अध्यक्ष विश्वास गावकर, सचिव वैशाली शंकरदास, खजिनदार अनुष्का चव्हाण , दीक्षा गावकर यासह मालवण मधील सेवाभावी संस्थांचे सदस्य, पर्यटन व्यावसायिक, महाविद्यालयाचे माजी विदयार्थी, प्राध्यापक, कर्मचारीवर्ग आदी उपस्थित होते. प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांनी सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन केले.
