मडुऱ्यात पाईपलाईनसाठी खोदलेल्या चरात मगरींचे वास्तव्य

सुदैवाने शेतकरी वाचला : बंदोबस्त करण्याची मागणी

*⚡बांदा ता.२७-:* मडुरा मळा परिसरातील भातशेतीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यासमोर अचानक सुमारे आठ फुटी मगर आल्याने शेतकऱ्याची भीतीने गाळणच उडाली. हुशारीने त्याने आपले प्राण वाचविले परंतु धोका मात्र कायम आहे. पाईपलाईनसाठी खोदलेल्या चरात मगरींचे वास्तव्य असून चराच्या दोन्ही बाजूने भातशेती आहे. मळा परिसरातील पूर्ण भातशेती कापणीयोग्य बनत असल्याने भातपीक कापायचे की मगरींना घाबरून घरी बसायचे असा सवाल शेतकऱ्यांनी वनविभागाला केला आहे. रक्ताला आसुसलेल्या मगरींचा तात्काळ बंदोबस्त करून मगरींच्या जबड्यात अडकलेली भातकापणी वाचविण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. मगरींच्या हल्ल्यात अनेक शेतकरी जखमी तर शेकडो पाळीव प्राणी आजपर्यंत मृत पावल्याच्या घटना मडुरा पंचक्रोशीत घडल्या आहेत. मडुरा-रेडकरवाडी येथील शेतकरी प्रवीण परब भातपिकाची पाहणी करण्यासाठी गेले होते. परंतु पाईपलाईन साठी खोदलेल्या चरात रक्ताला आसुसलेली मगर अगोदरच दबा धरून बसली होती. परंतु मगरीची चाहूल लागताच त्यांनी हुशारीने पाठीमागे येत मगरीवर लाकूड फेकले अन् मगरीने पाण्यात उडी घेतल्याचे त्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page