बांदा पत्रकारांचे पोलिस ठाण्यातील गणरायाला साकडे
*⚡बांदा ता.२४-:*कोरोनाच्या जैविक संकटाशी सामना करताना कोकणाला महापुराच्या नैसर्गिक आपत्तीशी सामना करावा लागला. या आपत्तीत व्यापारी, ग्रामस्थ यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. अशी जैविक व नैसर्गिक आपत्ती पुन्हा उद्भवू नये, सर्वांचे आरोग्य उत्तम राहू दे, सर्वांना सुखी, समाधानी ठेव, असे साकडे बांदा पत्रकारांनी येथील पोलिस ठाण्यात विराजमान झालेल्या गणरायाला घातले. बांदा पोलिस ठाण्यात श्री देव पाटेश्वर मंदिरात दरवर्षी गणरायाची २१ दिवस मनोभावे व भक्तीपूर्ण वातावरणात सेवा करण्यात येते. यावर्षी येथील पत्रकारांनी या सेवेत सहभाग घेतला. दुपारी येथे भजन सादर करण्यात आले. तसेच पत्रकारांनी भजन करत देवाला लागणारे तेल, धुप, अगरबत्ती, मोदक व नारळ अर्पण करून गणरायाला सर्व विघ्नांचे निराकरण करण्याचे साकडे घालण्यात आले. यावेळी पत्रकार विराज परब, अजित दळवी, निलेश मोरजकर, आशुतोष भांगले, प्रवीण परब, मंगल कामत, मयूर चराटकर, शैलेश गवस, राकेश परब, विश्वनाथ नाईक आदींसह प्रभारी पोलिस निरीक्षक शामराव काळे, पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, पोलीस कर्मचारी विठोबा सावंत, श्री. लोंढे आदी उपस्थित होते.
